हार्ले डेव्हिडसन: नरेंद्र मोदी चांगला माणूस पण अमेरिकेला काही फायदा नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2018 12:00 IST2018-02-27T11:58:54+5:302018-02-27T12:00:43+5:30
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा महागडया हार्ले डेव्हिडसन बाईकवर आकारल्या जाणाऱ्या आयात शुल्काचा मुद्दा उपस्थित केला आहे.

हार्ले डेव्हिडसन: नरेंद्र मोदी चांगला माणूस पण अमेरिकेला काही फायदा नाही
वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा महागडया हार्ले डेव्हिडसन बाईकवर आकारल्या जाणाऱ्या आयात शुल्काचा मुद्दा उपस्थित केला आहे. हार्ले डेव्हिडसन बाईकवरील आयात शुल्क 50 टक्क्याने कमी करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाचा अमेरिकेला काहीही फायदा नाही असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. व्हाइट हाऊसमध्ये अमेरिकेच्या सर्व प्रांतातील राज्यपालांना संबोधित करताना ट्रम्प यांनी मोदी यांच्याबरोबर झालेल्या संभाषणाचा दाखला दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मला फोन आला होता. त्यांनी मला हार्ले डेव्हिडसन बाईकवर आकारले जाणारे आयात शुल्क 50 टक्क्यांनी कमी करत असल्याचं सांगितलं. मी त्यांना ओके म्हटलं. पण त्यातून अमेरिकेचा काय फायदा ? अमेरिकेला काहीही मिळत नाहीय पण भारताला 50 टक्के मिळतायत. त्यांना असे वाटते कि, आपण अमेरिकेला मदत करतोय पण याला मदत म्हणता येणार नाही असे ट्रम्प यांनी सांगितले.
माझ्या दुष्टीने मोदी एक चांगला माणसू आहे. त्यांचा मला फोन आला. हार्ले डेव्हिडसन बाईकवरील आयात शुल्क 75 वरुन 50 टक्क्यापर्यंत कमी करत असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यावर मी काय बोलू? मी आनंद व्यक्त करू का? हे आपल्यासाठी अजिबात चांगले नाही. हार्ले डेव्हिडसनसारखे असे अनेक करार आहेत असे ट्रम्प म्हणाले.
भारतीय दुचाकी विकत घेतल्यानंतर अमेरिकेला त्यातून शून्य उत्पन्न मिळते असे ट्रम्प म्हणाले. भारतात अमेरिकन दुचाक्यांवर आकारल्या जाणाऱ्या उच्च आयात शुल्काचा मुद्दा डोनाल्ड ट्रम्प यांनी महिन्याभरात दुसऱ्यांदा उपस्थित केला. ट्रम्प यांनी भारतातून अमेरिकेत आयात होणाऱ्या दुचाकींवर आयात शुल्क वाढवण्याचा इशारा दिला होता.