खलिस्तान टायगर फोर्सचा प्रमुख हरदीप सिंग निज्जरची कॅनडात हत्या; भारतासाठी मोस्ट वाँटेड
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2023 12:06 IST2023-06-19T11:29:37+5:302023-06-19T12:06:33+5:30
एनआयएने जालंधरच्या एका हिंदू पुजाऱ्याची हत्या केल्या प्रकरणी त्याच्यावर १० लाख रुपयांचा इनाम घोषित केला होता.

खलिस्तान टायगर फोर्सचा प्रमुख हरदीप सिंग निज्जरची कॅनडात हत्या; भारतासाठी मोस्ट वाँटेड
कॅनडातील कुख्यात खलिस्तानी दहशतवादी आणि भारतासाठी मोस्ट वाँटेड असलेल्या हरदीप सिंग निज्जरची दोन बंदुकधाऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील सरे शहरात ही घटना घडली आहे. निज्जरचा भारत विरोधी कारवाया, दंगली आणि आंदोलनांमध्ये मोठा हात होता. निज्जरचे नाव भारताच्या मोस्ट वाँटेड ४० दहशतवाद्यांच्या यादीत होते. तो जालंधरच्या हरसिंगपूरचा रहिवासी होता. कॅनडामध्ये तो प्लंबर म्हणून काम करत होता, नंतर त्याने दहशतवादी संघटनेसोबत काम करण्यास सुरुवात केली होती.
एनआयएने जालंधरच्या एका हिंदू पुजाऱ्याची हत्या केल्या प्रकरणी त्याच्यावर १० लाख रुपयांचा इनाम घोषित केला होता. पुजाऱ्याची हत्या करण्याचा कट खलिस्तान टायगर फोर्सने रचला होता. तत्पूर्वी निज्जरवर भारतविरोधी दहशतवादी कारवाया करण्यावरून एनआयएने चार्जशीट दाखल केली होती.
2013-14 मध्ये निज्जर आयएसआयने बोलविले म्हणून पाकिस्तानला गेला होता. यावेळी त्याची खलिस्तानी दहशतवादी जगतार सिंग तारासोबत भेट झाली होती. ताराला २०१५ मध्ये थायलंडमधून ताब्यात घेण्यात आले होते. यानंतर निज्जरने ब्रिटीश कोलंबियाच्या एका शहरात खलिस्तानी दहशतवाद्यांचा कॅम्प भरविला होता. यामध्ये दहशतवाद्यांना छोट्या शस्त्रांची ट्रेनिंग दिली होती. गेल्या वर्षभरात निज्जर हा भारतीय तपास यंत्रणांसाठी मोठी डोकेदुखी बनला होता. त्याने लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या कार्यकर्त्यांना परदेशात रसद आणि पैसा पुरवायला सुरुवात केली होती.