बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 20:36 IST2025-10-27T20:32:57+5:302025-10-27T20:36:30+5:30
अब्दुल्ला बिन अब्दुर रज्जाक हे अल जामिया अस सलीफाचा अध्यक्ष शेख अब्दुर रज्जाक बिन युसूफ याचा मुलगा आहे. त्याने पाकिस्तानी मौलानाला राजशाही शहरातील नौदापारा येथील संघटनेच्या कॅम्पसमध्ये नेले

बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
ढाका - कुख्यात दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबाचा नेता हाफीज सईद बांगलादेशच्या धरतीवर वेगाने पाय पसरत आहे. हाफीजचा जवळचा सहकारी आणि मरकजी जमीयत अहल ए हदीसचा सदस्य २५ ऑक्टोबरला ढाका येथे पोहचला. त्यानंतर त्याने २७ ऑक्टोबरला भारतबांगलादेश सीमेवरील चपैनवाबगंज परिसरात दौरा केला. इब्तिसाम इलाही जहीर नावाच्या या मौलानाचा दौरा इस्लामशी निगडीत असल्याचा दाखवला जातोय परंतु भारत बांगलादेश सीमेवरील वाढत्या हालचालींमुळे ईशान्य भारतात काहीतरी मोठं षडयंत्र सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. याआधीही पाकिस्तानी गुप्तचर एजन्सी आयएसआयने ईशान्येकडे अस्थिरता निर्माण करण्याचा कट रचला होता.
एका रिपोर्टनुसार, मरकजी जमीयत अहल ए हदीसचा इब्तिसाम इलाही जहीर २ दिवसापूर्वी अचानक बांगलादेश दौऱ्यावर आल्याने गुप्तचर यंत्रणा हैराण आहेत. जहीर मरकजी जमीयत अहल ए हदीसचा महासचिव आहे. बांगलादेशी गुप्तचर यंत्रणाही जहीरच्या हालचालींवर नजर ठेवून आहेत. जहीर २५ ऑक्टोबरला संध्याकाळी राजशाहीच्या शाह मकदूम विमानतळावर उतरला होता. अब्दुर रहीम बिन रज्जाक नावाच्या व्यक्तीने त्याचे स्वागत केले. तो अल जामिया अस सलिफाचा सदस्य आहे. जी देशातील अहल ए हदीस चळवळीतील बांगलादेशीत शाखेशी जोडलेला आहे.
अब्दुल्ला बिन अब्दुर रज्जाक कोण आहे?
अब्दुल्ला बिन अब्दुर रज्जाक हे अल जामिया अस सलीफाचा अध्यक्ष शेख अब्दुर रज्जाक बिन युसूफ याचा मुलगा आहे. त्याने पाकिस्तानी मौलानाला राजशाही शहरातील नौदापारा येथील संघटनेच्या कॅम्पसमध्ये नेले. ८ ऑगस्ट २०२४ रोजी शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालील अवामी लीग सरकार कोसळल्यानंतर आणि मोहम्मद युनूस यांची अंतरिम सरकार प्रमुख म्हणून नियुक्ती झाल्यानंतर जहीर याचा बांगलादेशचा हा दुसरा दौरा आहे असं नॉर्थईस्ट न्यूजने वृत्त दिले आहे. सोमवारी सकाळी जहीर नौदापारा ते चपैनवाबगंज येथे रवाना झाला. या दोघांनी भारत बांगलादेश सीमेवर काही परिसरात दौरा केला. तिथे स्थानिक मस्जिदीमध्ये बैठकांचा कार्यक्रम घेतला.
जहीर २९ आणि ३१ नोव्हेंबरला सीमेवरील रंगपूर, लालमोनिरहाट आणि निलफामारीसारख्या परिसराचा दौरा करणार आहे. १ नोव्हेंबरला जॉयपुरहाट आणि २ नोव्हेंबरला नागाव येथे तो असेल. त्यानंतर ६ आणि ७ नोव्हेंबरला राजशाहीच्या पाबा उपजिल्ह्यातील डांगीपारा येथे सलाफी संमेलनाला संबोधित करेल. त्यानंतर ८ नोव्हेंबरला तो पाकिस्तानात परतणार आहे. जहीरच्या बांगलादेश भारत सीमेवरील दौऱ्यामुळे भारतासाठी धोक्याची घंटा मानली जाते. जहीर एक कट्टर इस्लामी मौलाना आहे जो विषारी विधानांसाठी कुख्यात आहे. त्याने अनेकदा गैर मुस्लिमाविरोधात हिंसेची भाषा केली. त्यामुळे भारत-बांगलादेश सीमेवर त्याचा दौरा भारताला ईशान्येकडे चिंताजनक ठरू शकतो. भारत आणि बांगलादेश यांच्या सीमेचा बहुतांश भाग खुला आहे त्यामुळे जहीर ब्रेनवॉश करून याठिकाणी घुसखोरी करू शकतो असं बोलले जाते.