नवी दिल्ली/दुबई: मध्य-पूर्वेतील युद्ध रंगात आले असतानाच एका जागतिक संरक्षण अहवालाने खळबळ उडवून दिली आहे. 'ब्लूमबर्ग' या वृत्तसंस्थेने दावा केला आहे की, इराणचे हल्ले रोखण्यासाठी संयुक्त अरब अमिराती आणि कतार वापरत असलेल्या संरक्षण क्षेपणास्त्रांचा साठा वेगाने संपत चालला आहे. मात्र, संबंधित देशांनी हा दावा पूर्णपणे फेटाळून लावत ही माहिती 'भ्रामक' असल्याचे म्हटले आहे.
काय आहे ब्लूमबर्गचा वादग्रस्त दावा?ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, इराणकडून सातत्याने होणाऱ्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांमुळे यूएई आणि कतारची 'पॅट्रियट' सारखी संरक्षण यंत्रणा निकामी होण्याची भीती आहे, कारण त्यांचा क्षेपणास्त्र साठा संपत आला आहे. दोन्ही देश खासगीरित्या आपल्या मित्र राष्ट्रांकडे विनंती करत आहेत की, त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इराणवरील लष्करी कारवाई मर्यादित ठेवण्यास सांगावे. कारण इराणने गेल्या आठ महिन्यांत मोठी तयारी केली होती, दाव्यानुसार हजारो क्षेपणास्त्रे त्यांच्या ताफ्यात आहेत.
UAE आणि कतारचा पलटवारयूएईच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, हा अहवाल देशाच्या तयारीबद्दल चुकीची माहिती देतो. यूएईकडे बहुस्तरीय हवाई संरक्षण यंत्रणा असून ती कोणत्याही धोक्याचा सामना करण्यास पूर्णपणे सक्षम आहे. तसेच, त्यांच्याकडे दारूगोळ्याचा मोठा साठा उपलब्ध असून ते दीर्घकाळ प्रत्युत्तर देऊ शकतात.
कतारचा इशाराकतारने ब्लूमबर्गचा रिपोर्ट 'बेजबाबदार' असल्याचे म्हटले आहे. कतारच्या आंतरराष्ट्रीय मीडिया कार्यालयाने स्पष्ट केले की, त्यांच्याकडे पुरेशा प्रमाणात क्षेपणास्त्रे उपलब्ध आहेत. चुकीची माहिती पसरवल्याबद्दल कतारने ब्लूमबर्गवर कायदेशीर कारवाई करण्याची धमकी दिली आहे.
युद्धाची सद्यस्थितीइराण सातत्याने आखाती देशांतील अमेरिकन तळांना लक्ष्य करत आहे. हे हल्ले रोखण्यासाठी सौदी, यूएई आणि कतार आपली एअर डिफेन्स यंत्रणा रात्रंदिवस कार्यरत ठेवत आहेत. या पार्श्वभूमीवर असा अहवाल येणे हे या देशांच्या मनोबलावर परिणाम करणारे ठरू शकते, असे विश्लेषकांचे मत आहे.