अमेरिकेमधील एका दुकानामध्ये चोरी करताना मुळची गुजराती असलेली एक भारतीय महिला पकडली गेली. दरम्यान, पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर चौकशी वेळी ढसाढसा रडतानाचा या महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पोलीस रिलीज नावाच्या एका युट्युब चॅनेलवर अपलोड करण्यात आला आहे. ही घटना १५ जानेवारी रोजी घडल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र तिचा व्हिडीओ ४ दिवसांपूर्वी अपलोड करण्यात आला आहे. मात्र प्रसारमाध्यमांकडून या व्हिडीओच्या सत्यतेला दुजोरा देण्यात आलेला नाही.
या व्हिडीओमध्ये एक महिला घाबरलेल्या स्थितीत हाज जोडून बसलेली दिसत आहे. तसेच पोलीस तिची चौकशी करत आहेत. चौकशी सुरू होण्यापूर्वी तिची झडती घेतली जाते. त्यावेळी ती ढसाढसा रडू लागल्याचे व्हिडीओत दिसत आहे. जेव्हा या महिलेला तिची वैयक्तिक माहिती विचारण्यात आली तेव्हा तिने तिची मूळ भाषा गुजराती असल्याचे आणि आपण भारतीय असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, ज्या दुकानात चोरी झाली तेथील एक कर्मचारी पोलिसांना सीसीटीव्ही चित्रफीत दाखवताना दिसत आहे. त्यात ही महिला पैसे न देता सामान चेक आऊट काऊंटरवरून पुढे घेऊन जाताना दिसत आहे. त्यानंतर घाबरलेल्या या महिलेला पोलीस सांगतात की, तुला दुकानात सामान चोरताना पकडल्याने इथे आणण्यात आलं आहे. तुझ्याकडे कुठलं ओळखपत्र आहे का? मग ही महिला चोरी केल्याचे मान्य करते. तसेच ती मी एका दुकानातून वस्तूंची चोरी केली आणि त्या विकायचा प्रयत्न केला, असे मान्य करते. मला सोडा, यानंतर मी असं करणार नाही, असंही ती सांगते.
त्यानंतर अमेरिकन पोलीस या महिलेला कुठल्याही औपचारिक आरोपाविना मुक्त करण्याचा निर्णय घेतात. मात्र तत्पूर्वी तिला असा गुन्हा पुन्हा न करण्याची सक्त ताकीद दिली जाते. तसेच एक अधिकारी तिला इशारा देऊन सोडून देतो. आता या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यावर युझर्सकडून वेगवेगळ्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या जात आहेत.