'या' देशात शेतकरी उतरले ट्रॅक्टर घेऊन रस्त्यावर; पोलिसांसोबत झाली धक्काबुक्की

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 14:34 IST2025-02-20T14:32:28+5:302025-02-20T14:34:16+5:30

बुधवारी मध्य ग्रीसमधून जवळपास ५० ट्रॅक्टरच्या ताफ्यातून १,००० हून अधिक आंदोलक शेतकरी उत्तरेकडील शहरात दाखल झाले.

greece farmers protest block traffic with tractors scuffle with police | 'या' देशात शेतकरी उतरले ट्रॅक्टर घेऊन रस्त्यावर; पोलिसांसोबत झाली धक्काबुक्की

'या' देशात शेतकरी उतरले ट्रॅक्टर घेऊन रस्त्यावर; पोलिसांसोबत झाली धक्काबुक्की

थेस्सालोनिकी : ग्रीसमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर असलेल्या थेस्सालोनिकीमध्ये बुधवारी शेतकऱ्यांनी आंदोलन केले. यावेळी रात्री उशिरा आंदोलक शेतकरी आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली. तत्पूर्वी शेतकऱ्यांनी पंतप्रधान किरियाकोस मित्सोटाकिस ज्या ठिकाणी भाषण देत होते, त्या ठिकाणाजवळील सुरक्षा घेरा तोडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या घटनेत कोणीही जखमी झाल्याचे किंवा अटक झाल्याचे वृत्त नव्हते.

बुधवारी मध्य ग्रीसमधून जवळपास ५० ट्रॅक्टरच्या ताफ्यातून १,००० हून अधिक आंदोलक शेतकरी उत्तरेकडील शहरात दाखल झाले. रात्रीच्या वेळी रॅलीदरम्यान शेतकऱ्यांनी काळे झेंडे फडकवत आणि आपत्कालीन दिवे लावत थेस्सालोनिकीमधील मुख्य रस्ते ट्रॅक्टरने रोखले. यावेळी शहरातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. त्यामुळे अनेकांना अडचणींचा सामना करावा लागला. यानंतर पोलिसांनी आंदोलकांना बाजूला करत शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले.

दरम्यान, अलिकडच्या काही महिन्यांत संपूर्ण युरोपमध्ये शेतकऱ्यांनी अशाच प्रकारचे निदर्शने केली आहेत. ग्रीसमधील कृषी संघटना गेल्या काही आठवड्यांपासून निदर्शने करत आहेत. हवामान बदलामुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानासह विविध मुद्द्यांवर सरकारी मदतीची मागणी करत आहेत. २०२३ च्या अखेरीस आलेल्या विनाशकारी पुरानंतर शेतकरी अजूनही संघर्ष करत असलेल्या मध्य ग्रीसमधील टेसाली येथे हे आंदोलन तापले आहे.

Web Title: greece farmers protest block traffic with tractors scuffle with police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.