श्रीलंकेत राष्ट्राध्यक्षपदी गोताबाया राजपक्षे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2019 01:31 IST2019-11-18T01:31:44+5:302019-11-18T01:31:57+5:30
दहशतवादी हल्ल्यानंतर सत्तांतर; राष्ट्रवादाला कौल

श्रीलंकेत राष्ट्राध्यक्षपदी गोताबाया राजपक्षे
कोलंबो : सात महिन्यांपूर्वी ईस्टर सण्डेच्या दिवशी काही प्रमुख चर्च आणि हॉटेलांवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर शनिवारी झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत श्रीलंकेच्या मतदारांनी सत्तांतराच्या बाजूने कौल दिला आहे. निवडणूक आयोगाने अधिकृत अंतिम निकाल जाहीर केला नसला तरी प्रखर राष्ट्रवादाच्या मुद्यावर निवडणूक लढविलेले श्रीलंका पोदुजना पेरामुना (पीपल्स पार्टी)चे उमेदवार गोताबाया राजपक्षे श्रीलंकेचे सातवे राष्ट्राध्यक्ष होतील, हे स्पष्ट झाले आहे. विजयी होण्यासाठी आवश्यक असलेला किमान ५० टक्के मतांचा पल्ला राजपक्षे यांनी रविवारी दुपारीच ओलांडला होता. त्यामुळे त्यांचा विजय याहूनही अधिक मताधिक्याने होईल, असे दिसते.
सत्ताधारी ‘युनायटेड नॅशनल पार्टी’चे नेते व मावळते पंतप्रधान रनिल विक्रमसिंगे यांनी स्वत: बाजूला होऊन आपले पक्षाचे उपनेते सजित प्रेमदास यांना उमेदवारी दिली होती. अंतिम निकाल जाहीर होण्याआधीच प्रेमदास यांनी मोठ्या मनाने आपला पराभव मान्य करून राजपक्षे यांचे अभिनंदन केले. ‘पीपल्स पार्टी’चे प्रवक्ते केहेलिया राम्बुकवेला यांनी राजपक्षे यांचा विजय अधिकृतपणे जाहीर करून त्यांचा शपथविधी सोमवार किंवा मंगळवारी होईल, असे सांगितले.
गोताबाया राजपक्षे यांच्या विजयाने पाच वर्षांच्या खंडानंतर श्रीलंकेची सत्ता पुन्हा ‘पीपल्स पार्टी’कडे व पर्यायाने अत्यंत प्रभावी अशा राजपक्षे घराण्याकडे आली आहे. गोताबाया हे सन १९९३ मध्ये तामिळ अतिरेक्यांच्या आत्मघाती बॉम्बहल्ल्यात प्राण गमवावे लागलेले माजी राष्ट्राध्यक्ष रणशिंगे प्रेमदास यांचे चिरंजीव व याच पक्षाचे याआधी राष्ट्राध्यक्ष झालेले महिंद राजपक्षे यांचे धाकटे बंधू आहेत. स्वत: निवृत्त लष्करी अधिकारी असलेले ७० वर्षांचे गोताबाया याआधी देशाचे संरक्षणमंत्रीही होते. त्यावेळी त्यांनी निकराने लष्करी कारवाई करून उत्तर व ईशान्य प्रांतांतील तामिळ बंडखोरांचा पाडाव करीत देशात ३७ वर्षे चाललेल्या वांशिक गृहयुद्धाचा कायमचा पायबंद केला होता. आताही ते बहुसंख्य असलेल्या बौद्ध धर्मीय सिंहली मतदारांच्या मतांवरच निवडून आले आहेत. ‘हिंसक कर्दनकाळ’ म्हणून तामिळ व मुस्लिम अल्पसंख्य समाजांमध्ये ते अप्रिय आहेत.
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार एकूण १.६० कोटी मतदारांपैकी सुमारे ८० टक्के मतदारांनी शनिवारच्या मतदानात भाग घेतला होता. त्यापैकी किमान ५३-५४ टक्के मते गोताबाया यांनी मिळविली.
(वृत्तसंस्था)
मोदींनी केले अभिनंदन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टष्ट्वीट करून गोताबाया राजपक्षे यांचे अभिनंदन करताना म्हटले की, दोन्ही देशांमधील व त्यांच्या जनतेमधील घनिष्ठ बंधुभावाचे संबंध आधिक बळकट करण्यासाठी तसेच जगाच्या या भागात शांतता नांदून समृद्धी यावी यासाठी तुमच्यासोबत जवळिकीने काम करायला मला आवडेल.
गोताबाया यांनीही टष्ट्वीट करून त्यांचे तसेच भारतीय जनतेचे सदिच्छांबद्दल आभार मानले. दोन्ही देशांचे नाते इतिहास व सामायिक श्रद्धेने घट्ट जुळलेले आहे व त्यास अधिक मजबूत करण्यासाठी मी काम करीन.