२०२५ सर्वात ‘विषारी’ वर्ष? कार्बन उत्सर्जनात विक्रमी वाढ, ३८.१ अब्ज टन उत्सर्जन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 16:51 IST2025-11-17T16:49:59+5:302025-11-17T16:51:32+5:30
Global Carbon: पृथ्वीचा श्वास आता अधिकच गुदमरत चालल्याचे गंभीर संकेत ताज्या अहवालातून समोर आले आहेत.

२०२५ सर्वात ‘विषारी’ वर्ष? कार्बन उत्सर्जनात विक्रमी वाढ, ३८.१ अब्ज टन उत्सर्जन
लंडन: पृथ्वीचा श्वास आता अधिकच गुदमरत चालल्याचे गंभीर संकेत ताज्या अहवालातून समोर आले आहेत. ‘ग्लोबल कार्बन बजेट २०२५’ या अहवालानुसार, यंदा जीवाश्म इंधनांमधून होणारे कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन तब्बल ३८.१ अब्ज टनांपर्यंत पोहोचणार आहे. हे आतापर्यंतचे सर्वात जास्त प्रमाण ठरेल. गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी उत्सर्जनात १.१ टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. ऊर्जेची वाढती जागतिक मागणी पूर्ण करण्यासाठी अनेक देश अजूनही कोळसा, तेल व वायूवर प्रचंड अवलंबून आहेत. त्यामुळे हवामान संकट तीव्र होण्याचा इशारा अहवालात दिला आहे.
तातडीने बदल गरजेचे
अहवालाचे प्रमुख लेखक व हवामान तज्ञ पियरे फ्राइडलिंगस्टीन यांच्या मते, आता जागतिक तापमानवाढ १.५ अंश सेल्सियसच्या मर्यादेत रोखणे अशक्यप्राय झाले आहे. २०१६ च्या पॅरिस करारामध्ये ही मर्यादा जागतिक पातळीवर निश्चित करण्यात आली होती. परंतु वैज्ञानिकांचे म्हणणे आहे, “धरती सांगू लागली आहे की, मोठे बदल व तातडीने करणे अनिवार्य झाले आहे.”
तज्ज्ञांचा सल्ला काय?
तज्ञांच्या मते, हवामान बदलाचा वेग लक्षात घेता, हरित ऊर्जेकडे झपाट्याने वळणे आणि जीवाश्म इंधनांवरील अवलंबन तत्काळ कमी करणे हा कार्बन उत्सर्जन वेगाने कमी करण्याचा आता एकमेव उपाय
उरला आहे.