'आमची जहाजे पाठवतो, डिझेल द्या हो...!', इराणच्या सवलतीनंतर पाकिस्तानची कुवैतसमोर विनवणी; होर्मुझचा मार्ग मोकळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 12:36 IST2026-03-31T12:35:51+5:302026-03-31T12:36:35+5:30
Kuwait Pakistan Diesel Jet Fuel Supply : अमेरिका-इराण युद्धाच्या तणावात पाकिस्तानला इराणकडून मोठी सवलत मिळाली आहे. आता कुवैतकडून डिझेल आणि जेट इंधन आणण्यासाठी पाकिस्तान सज्ज झाला आहे.

'आमची जहाजे पाठवतो, डिझेल द्या हो...!', इराणच्या सवलतीनंतर पाकिस्तानची कुवैतसमोर विनवणी; होर्मुझचा मार्ग मोकळा
जागतिक ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानला इराणकडून मोठा दिलासा मिळाला आहे. अमेरिका आणि इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान इराणने होर्मुझची सामुद्रधुनी अंशतः बंद केली असली, तरी पाकिस्तानच्या २० जहाजांना या मार्गावरून जाण्याची विशेष सवलत दिली आहे. या संधीचा फायदा घेत पाकिस्तानने आता कुवैतकडे डिझेल आणि जेट इंधनासाठी साकडे घातले आहे.
पाकिस्तानचे पेट्रोलियम मंत्री अली परवेज मलिक यांनी कुवैतच्या राजदूतांशी चर्चा केली. "इराणने आमची जहाजं सोडण्याचे मान्य केले आहे, त्यामुळे तुम्ही आम्हाला इंधन द्या, आम्ही आमची जहाजं पाठवून ते घेऊन येऊ," अशी विनंती पाकिस्तानने केली. यावर कुवैत पेट्रोलियम कॉर्पोरेशनने सहमती दर्शवली असून, पाकिस्तानला डिझेल आणि जेट इंधन पुरवण्याचे आश्वासन दिले आहे.
इराणची नवी रणनीती - 'टोल' वसुली?
एकडे इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीवर आपले नियंत्रण अधिक मजबूत करण्यासाठी नवीन योजना आखली आहे. 'वॉल स्ट्रीट जर्नल'च्या रिपोर्टनुसार, इराण या मार्गावरून जाणाऱ्या जहाजांवर 'टोल' लावण्याच्या तयारीत आहे. तसेच, अमेरिका, इस्रायल आणि इराणवर निर्बंध लादणाऱ्या देशांच्या जहाजांना या मार्गावरून जाण्यास पूर्णपणे बंदी घातली जाऊ शकते.
भारतावर काय परिणाम?
होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्याचा सर्वाधिक फटका भारतालाही बसला होता, कारण भारताची ९०% एलपीजी आयात याच मार्गावरून होते. मात्र, काही आठवड्यांपूर्वी इराणने भारताच्या 'नंदा देवी' आणि 'शिवालिक' यांसारख्या जहाजांना सोडले होते, ज्यामुळे भारतीय बाजारपेठेतील गॅस टंचाई काही प्रमाणात कमी झाली आहे.