"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 15:50 IST2025-08-14T15:47:34+5:302025-08-14T15:50:58+5:30
आता चीनला टक्कर देण्यासाठी त्याचा शत्रू देश तयार झाला आहे. या देशाने आता मूल जन्माला घालण्यासाठी तब्बल ६ लाख देण्याची घोषणा केली आहे.

"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
काही दिवसांपूर्वी चीनने 'मूल जन्माला घाला आणि १ लाख रुपये मिळवा' अशी योजना आणली होती. आता चीनला टक्कर देण्यासाठी त्याचा शत्रू देश तयार झाला आहे. या देशाने आता मूल जन्माला घालण्यासाठी तब्बल ६ लाख देण्याची घोषणा केली आहे. हा देश आहे तैवान. चीनचा शत्रू देश अशी याची ओळख आहे. जन्मदरात सातत्याने घट होत असल्याने तैवान सरकारने अनुदान वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत तैवानमध्ये मुलाला जन्म देण्यासाठी तब्बल ६ लाख रुपये (६७०० डॉलर्स) दिले जातील. तैवान सरकारने याची घोषणा केली आहे. लवकरच मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर ते लागू करण्याची तयारी सुरू झाली आहे.
तैवानच्या स्थानिक माध्यमांनुसार, सरकारने आयव्हीएफच्या मदतीने मुले जन्माला घालणाऱ्या लोकांसाठी हे अनुदान आणखी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी, तैवान सरकार मूल जन्माला घालण्यासाठी ३३३० डॉलर्स देत असे, जे आता ६७०० डॉलर्सपर्यंत वाढवण्याची योजना आहे.
तैवानमध्ये वाढत्या महागाईमुळे आणि घटत्या जन्मदरामुळे सरकार चिंतेत आहे. त्यामुळेच आता तैवानच्या आरोग्य आणि कल्याण मंत्रालयाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यानुसार, प्रजनन उपचारांसाठी दुसऱ्या ते सहाव्या चक्रापर्यंतची सबसिडी वाढवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आता तैवानमध्ये मूल जन्माला घालण्यासाठी किमान ६७०० डॉलर्स (अंदाजे ५.५ लाख रुपये) दिले जाणार आहेत.
चीनपेक्षा ५ पट जास्त मदत!
चीननेही लोकसंख्या वाढवण्यासाठी नुकताच एक निर्णय घेतला होता. त्यानुसार सरकारने प्रत्येक चिनी जोडप्याला मूल जन्माला घालण्यासाठी १.३० लाख रुपये देण्याची घोषणा केली होती. पण तैवानची ही नवीन योजना चीनच्या मदतीपेक्षा तब्बल ५ पट जास्त आहे. चीनला भीती आहे की, २०५० पर्यंत देशात तरुणांची संख्या कमी होईल. त्यामुळे अनेक वर्षांपासून चालत आलेला 'एकच मूल' हा नियम चीनने आता मागे घेतला आहे.
तैवानमधील घटता जन्मदर
२०२४मध्ये तैवानमध्ये केवळ १.३५ लाख मुलांचा जन्म झाला, जो एक नवा विक्रम आहे. गेल्या ९ वर्षांपासून तैवानमध्ये जन्मदर सातत्याने घटत आहे. वर्ल्डमीटरनुसार, तैवानची एकूण लोकसंख्या २.३० कोटी आहे, त्यापैकी २०% लोक ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत. तैवानचा प्रजनन दर ०.८५ आहे, जो चीनपेक्षाही कमी आहे. त्यामुळेच तैवानला आपली लोकसंख्या वाढवण्याची चिंता सतावत आहे.
तैवान आणि चीन यांच्यातील संघर्ष
तैवान स्वतःला एक स्वतंत्र देश मानतो, तर चीन त्याला आपला भाग मानतो. या दोन देशांमध्ये सतत तणाव असतो. नुकत्याच समोर आलेल्या अमेरिकेच्या एका गुप्तचर अहवालात असं म्हटलं आहे की, चीन २०२७पर्यंत तैवानवर कब्जा करण्याचा प्रयत्न करू शकतो. त्यामुळे तैवान चीनशी लढण्यासाठी अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात शस्त्र खरेदी करत आहे.