अमेरिकेत नोकरीस जाणे झाले आता अधिक कठीण; कर्मचाऱ्यांच्या स्वयंचलित मुदतवाढीची वर्क परमिट योजना बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 08:01 IST2025-10-31T08:01:09+5:302025-10-31T08:01:20+5:30
या निर्णयाचा मोठा फटका अमेरिकेत नोकरी करायला गेलेल्या भारतीय कर्मचाऱ्यांना बसणार आहे.

अमेरिकेत नोकरीस जाणे झाले आता अधिक कठीण; कर्मचाऱ्यांच्या स्वयंचलित मुदतवाढीची वर्क परमिट योजना बंद
वॉशिंग्टन : एच वनबी व्हिसा शुल्काची रक्कम एक लाख डॉलर वाढविल्यानंतर बुधवारी अमेरिकेने परदेशी नागरिकांना फायद्याची असलेल्या वर्क परमिट स्वयंचलित मुदतवाढ योजनेला बंद करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयाचा मोठा फटका अमेरिकेत नोकरी करायला गेलेल्या भारतीय कर्मचाऱ्यांना वा स्थलांतरितांना होणार आहे. अमेरिकेत अनेक देशांतून होणारे आहे. अमेरिकेत अनेक देशांतून होणारे स्थलांतर थांबविण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे डिपार्टमेंट ऑफ होमलैंड सिक्युरिटीने म्हटले आहे. हा निर्णय घेताना अमेरिकेने 'रोजगार अधिकृतता कागदपत्रां'ची वैधता वाढण्याआधी परदेशी नागरिकांची काटेकोर तपासणी व त्यांच्या सखोल पडताळणीला आपण प्राधान्य देत असल्याचे म्हटले आहे.
२०२२च्या यूएस जनगणनेनुसार अमेरिकेत सुमारे ४८ लाख भारतीय अमेरिकन नागरिक राहत असून, त्यात ६६ टक्के स्थलांतरित आणि उर्वरित ३४ टक्के अमेरिकेत जन्मलेले आहेत.
फटका कोणाला बसणार?
एच वनबी व्हिसाधारकांच्या जोडीदारांवर
एल आणि ई श्रेणीतील व्हिसाधारकांच्या जोडीदारांवर
आश्रय किंवा निर्वासितांचा दर्जा मिळालेल्या परदेशी नागरिकांवर
विद्यार्थ्यांचा एफ-१ व्हिसा
राजनयिक मोहिमेवर किंवा आंतरराष्ट्रीय संस्थेत कार्यरत कर्मचारी
वर्क परमिट मिळालेल्यांची अविवाहित मुले किंवा जोडीदार
'नोकरी हा हक्क नसून व्यक्तिगत फायदा'
नव्या नियमांनुसार दि. ३० ऑक्टोबर २०२५ रोजी किंवा त्यानंतर जे परदेशी नागरिक त्यांच्या रोजगार अधिकृतता कागदपत्राच्या नूतनीकरणासाठी अर्ज करतील त्यांना वर्क परमिटला आवश्यक असणारी स्वयंचलित मुदतवाढ मिळणार नाही. त्याचे कारण त्यांची काटेकोर तपासणी व त्यांच्या सखोल पडताळणीला झालेली नाही.
अमेरिकेने असेही स्पष्ट केले आहे की, त्यांच्या देशात रोजगारासाठी येणाऱ्या व्यक्तींचा हा हक्क नसून ते व्यक्तिगत फायद्यासाठी येतात. त्यामुळे जे रोजगार अधिकृततेसाठी अर्ज करतात, त्यांची अनेक वेळा सखोल तपासणी होऊ शकते.