तजाकिस्तानच्या पाच नागरिकांना जर्मनीत अटक, आयएसशी संबंध असल्याचा संशय; आखत होते 'असा' कट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 18:05 IST2020-04-15T17:45:26+5:302020-04-15T18:05:30+5:30
जानेवारी 2019मध्ये इस्लामिक स्टेटमध्ये सामील होणे आणि सुरुवातीला तजाकिस्तानमध्ये हल्ल्याचा कट आखणे, असे आरोप संशयित अजीजजोन बी, मुहम्मदली जी, फरहोशोह के, सुनतुलोख के आणि रावसन बी यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

तजाकिस्तानच्या पाच नागरिकांना जर्मनीत अटक, आयएसशी संबंध असल्याचा संशय; आखत होते 'असा' कट
बर्लिन : जर्मन पोलीसांनी तजाकिस्तानच्या पाच नागरिकांना संशयावरून अटक केली आहे. हे पाचही इस्लामिक स्टेटचे दहशतवादी असल्याचे सांगण्यात येत आहे. ते जर्मनीत तैनात असलेल्या अमेरिकन लष्करावर हल्ला करण्याचा कट आखत होते. उत्तर राइन-वेस्टफेलियाच्या पश्चिमेकडील राज्यात काही अपार्टमेंट्स आणि इतर सहा ठिकाणांवर बुधवारी सकाळी छापा टाकून चार संशयितांना अटक करण्यात आली. तर एकाला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे, अशी माहिती सरकारी वकिलांनी दिली आहे.
जानेवारी 2019मध्ये इस्लामिक स्टेटमध्ये सामील होणे आणि सुरुवातीला तजाकिस्तानमध्ये हल्ल्याचा कट आखणे, असे आरोप संशयित अजीजजोन बी, मुहम्मदली जी, फरहोशोह के, सुनतुलोख के आणि रावसन बी यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
सरकारी वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या या पाचही जणांनी अफगाणिस्तानातातील आयएसच्या दोन बड्या नेत्यांच्या आदेशावरून जर्मनीकडे आपला मोर्चा वळवला होता. हे पाचही जण अमेरिकन हवाई तळांबरोबरच अनेक ठिकाणी हल्ला करण्याच्या तयारीत होते. त्यांनी बॉम्बचे साहित्यदेखील ऑनलाईन बूक करून ठेवले होते. तसेच बंदुका आणि स्फोटकेही जमवून ठेवली होती. या शिवाय त्यांनी एका व्यक्तीच्या हत्येचाही कट आखला होता.
देशात जवळपास 11,000 इस्लामीक कट्टरपंथी आहेत. यापैकी काहींना अधिक धोकादायक आहेत, असा जर्मन सरकारचा अंदाज आहे. जर्मनी अनेक दिवसांपासून जिहादी संघटनांच्या निशाण्यावर आहे.