जनरल व्ही. के. सिंह उत्तर कोरियामध्ये, 20 वर्षांच्या कालावधीनंतर पहिल्यांदाच भारतीय नेत्याची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2018 01:24 PM2018-05-17T13:24:53+5:302018-05-17T13:24:53+5:30

1998 नंतर प्रथमच भारतातील उच्चपदस्थ व्यक्तीने उत्तर कोरियाला भेट दिली आहे. 15 आणि 16 मे असा त्यांनी उत्तर कोरियाचा दौरा केला. 

General V.K. Singh makes surprise visit to North Korea | जनरल व्ही. के. सिंह उत्तर कोरियामध्ये, 20 वर्षांच्या कालावधीनंतर पहिल्यांदाच भारतीय नेत्याची भेट

जनरल व्ही. के. सिंह उत्तर कोरियामध्ये, 20 वर्षांच्या कालावधीनंतर पहिल्यांदाच भारतीय नेत्याची भेट

Next

प्योंगयांग- परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी अचानक उत्तर कोरियाला भेट दिली. उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांग येथे जाऊन त्यांनी कोरियन सरकारच्या विविध अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. 1998 नंतर प्रथमच भारतातील उच्चपदस्थ व्यक्ती उत्तर कोरियाला गेली आहे. 15 आणि 16 मे असा त्यांनी उत्तर कोरियाचा दौरा केला. 

सिंह यांनी उत्तर कोरियाचे परराष्ट्र आणि सांस्कृतीक कार्य मंत्री किम योंग दाए यांची भेट घेतली व विविध राजकीय, प्रादेशिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतीक सहकार्य अशा विषयांवर त्यांनी चर्चा केली. परराष्ट्र मंत्रालयाने याबाबतची माहिती प्रसिद्ध केली आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर कोरियाने नुकत्याच दक्षिण कोरियासोबत झालेल्या चर्चेबद्दल सिंह यांना माहिती दिली त्याचप्रमाणे सिंह यांनीही उत्तर कोरिया व पाकिस्तान यांच्यामधिल संबंधांचा विषय उपस्थित केला. भारताच्या शेजारील देशात (पाकिस्तानात) कोणत्याही प्रकारे अण्वस्त्रांची वाढ होणे भारतासाठी काळजीचा मुद्दा आहे असे मत सिंह यांनी व्यक्त केले. त्यावर  भारताला कोणत्याही प्रकारचा सुरक्षेच्या बाबतीत प्रश्नास सामोरे जावे लागणार नाही असे आश्वासन उत्तर कोरियातर्फे दिले गेले. यावेळेस भारताचे उत्तर कोरियातील राजदूत अतुल गोतसुर्वे यांनी आपल्या पदासाठी मान्यतापत्र (क्रिडेन्शिअल) उत्तर कोरियाच्या पिपल्स असेम्ब्लीचे अध्यक्ष किम योंग नाम यांना सादर केली. सोमवारीच गोतसुर्वे यांनी पदभार स्वीकारला आहे.
व्ही. के. सिंह यांनी अचानक उत्तर कोरियाला भेट दिल्याने आणि त्या भेटीबाबत गुप्तता पाळल्याने भारत या देशाशी आपले संबंध पूर्ववत करण्याच्या प्रयत्नात असल्याचे सांगण्यात येत आहे.  मार्च 2017मध्ये भारताने अन्न आणि औषधे वगळता इतर कोणत्याही वस्तूंचा उत्तर कोरियाशी व्यापार करण्यावर बंदी घातली होती. अमेरिकेने संयुक्त राष्ट्रांमध्ये उत्तर कोरियावर सर्वपरीने बंदी घालण्याची विनंती केली होती. तसेच उत्तर कोरियात प्योंगयांग येथे असणाऱ्या दुतावासाला बंद करण्याची विनंती अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ स्टेट रेक्स टिलरसन यांनी केली होती. त्या विनंतीला भारताला नाकारले होते. अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यामध्ये तणाव निवळत असल्याचे दिसताच भारताने आपल्या धोरणामध्ये बदल केल्याचे दिसून येत आहे.

Web Title: General V.K. Singh makes surprise visit to North Korea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.