हमासचा खात्मा केल्यावर गाझामध्ये काय करणार इस्रायल?; नेतन्याहू यांनी जगाला सांगितला 'प्लॅन'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 04:35 PM2023-12-06T16:35:31+5:302023-12-06T16:40:36+5:30

Israel-Hamas War : नेतन्याहू यांनी गाझामधून आपल्या लोकांना परत आणण्यासाठी वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला.

gaza into demilitarised zone after war says israel pm benjamin netanyahu | हमासचा खात्मा केल्यावर गाझामध्ये काय करणार इस्रायल?; नेतन्याहू यांनी जगाला सांगितला 'प्लॅन'

हमासचा खात्मा केल्यावर गाझामध्ये काय करणार इस्रायल?; नेतन्याहू यांनी जगाला सांगितला 'प्लॅन'

इस्रायली सैन्याने गाझामध्ये आक्रमकपणे आपल्या कारवाया वाढवल्या आहेत. इस्त्रायली लष्कर, IDF यांनी उत्तरेनंतर दक्षिण गाझावर हल्ले तीव्र केले आहेत. गाझा लवकरच IDF च्या पूर्ण नियंत्रणाखाली येण्याची शक्यता असताना इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी युद्धाच्या उद्दिष्टांचा पुनरुच्चार केला आहे. नेतन्याहू यांनी पुन्हा एकदा हमासचं कंबरडं मोडून हमासच्या सर्व कमांडर्सना संपवण्याचा पुनरुच्चार केला आहे. नेतन्याहू यांनी असंही म्हटलं आहे की, इस्रायली सैन्य गाझा पट्टीमध्ये निशस्त्रीकरण क्षेत्र तयार करण्यासाठी काम करेल.

युद्धाचा उद्देश स्पष्ट करताना नेतान्याहू यांनी गाझामधून आपल्या लोकांना परत आणण्यासाठी वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला. याव्यतिरिक्त, हमासची लष्करी आणि राजकीय क्षमता पूर्णपणे नष्ट होईल. जेणेकरून भविष्यात इस्रायलला गाझा पट्टीपासून कोणताही धोका जाणवू नये. या गोष्टींसोबतच नेतन्याहू यांनी युद्ध संपल्यानंतरच्या प्लॅनचा देखील खुलासा केला. ते म्हणाले की, इस्रायली सैन्य गाझा पट्टीमध्ये एक निशस्त्रीकरण क्षेत्र तयार करण्यासाठी काम करेल. गाझा पट्टीचे निशस्त्रीकरण करण्यासाठी इतर कोणत्याही आंतरराष्ट्रीय शक्तीपेक्षा त्यांचा त्यांच्या सैन्यावर विश्वास आहे. डीएमझेड म्हणजेच डिमिलिटराइज्ड झोन हे असे क्षेत्र आहे जेथे सैन्य तैनात करणे, शस्त्रे तैनात करणे आणि इतर लष्करी गोष्टी केल्या जाऊ शकत नाहीत.

बेंजामिन नेतन्याहू यांनी मंगळवारी रात्री तेल अवीव येथे पत्रकार परिषदेत सांगितले की, युद्ध संपवण्यासाठी जगभरातून त्यांच्यावर दबाव आहे. येथून मी जगभरातील माझ्या मित्रांना सांगतो की, युद्ध लवकर संपवण्याचा आपला एकमेव मार्ग म्हणजे हमास विरुद्ध जबरदस्त शक्ती वापरून त्यांना संपवणं. केवळ लष्करी कारवाईमुळे गाझा युद्धाचा अंत आणि ओलीस परत येण्याची खात्री होईल. जर जगाला युद्ध लवकर संपवायचे असेल तर त्यांना आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे लागेल.

इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलेंट यांनीही गाझामधील लष्करी कारवाया सुरूच राहतील आणि हमासचा खात्मा केल्यानंतरच युद्ध थांबेल, असा पुनरुच्चार केला आहे. गॅलेंट म्हणाले की, गाझामध्ये सैन्य मोठा फायदा मिळवत आहे, परंतु ते मोठ्या नुकसानाशिवाय येत नाही. ग्राउंड ऑपरेशन सुरू झाल्यापासून गाझा पट्टीमध्ये 80 इस्रायली सैनिक मारले  गेले. नुकसान झाले तरी आम्ही लक्ष्यापासून मागे हटणार नाही. 
 

Web Title: gaza into demilitarised zone after war says israel pm benjamin netanyahu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.