बांगलादेशात 'खेला' झाला! अवामी लीगची ऑफिसं पुन्हा उघडली; शेख हसीना यांच्या पुनरागमनाची तयारी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 19:44 IST2026-02-22T19:40:29+5:302026-02-22T19:44:11+5:30

बांगलादेशात सत्तास्थापनेनंतर अचानक अवामी लीगचे कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत.

'Game' has started in Bangladesh! Awami League offices reopen; Preparations for Sheikh Hasina's return? | बांगलादेशात 'खेला' झाला! अवामी लीगची ऑफिसं पुन्हा उघडली; शेख हसीना यांच्या पुनरागमनाची तयारी?

बांगलादेशात 'खेला' झाला! अवामी लीगची ऑफिसं पुन्हा उघडली; शेख हसीना यांच्या पुनरागमनाची तयारी?

बांगलादेशातील सत्तासंघर्षात एक मोठे आणि नाट्यमय वळण पाहायला मिळत आहे. सार्वत्रिक निवडणुकीत बीएनपीने बाजी मारल्यानंतर आता अचानक देशभर बंद पडलेली 'अवामी लीग'ची कार्यालये पुन्हा उघडण्यास सुरुवात झाली आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडून जावे लागल्यानंतर ज्या कार्यालयांवर हल्ले झाले होते आणि जिथे टाळी ठोकली होती, तिथे आता पुन्हा अवामी लीगचे कार्यकर्ते दिसू लागल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

निवडणुकीनंतरची नवी समीकरणे

१२ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखालील बीएनपीने मोठा विजय मिळवला. मात्र, या निवडणुकीत अवामी लीगवर बंदी असल्याने त्यांनी सहभाग घेतला नव्हता. आता सत्तास्थापनेनंतर अचानक अवामी लीगचे कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. ढाकासह अनेक जिल्ह्यांत आणि उपजिल्ह्यांत पक्षाची कार्यालये उघडली जात आहेत. विशेष म्हणजे, काही ठिकाणी स्थानिक बीएनपी नेत्यांच्या उपस्थितीत ही कार्यालये उघडली जात असल्याचे व्हिडिओ समोर आल्याने, बीएनपी आणि अवामी लीगमध्ये पडद्यामागे काही डिल झाली आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

शेख हसीना पुन्हा सक्रिय?

अवामी लीगचे केंद्रीय सहसचिव एएफएम बहाउद्दीन नसीम यांनी स्पष्ट केले आहे की, पक्षाच्या कार्यालयांवर कोणतीही अधिकृत बंदी नव्हती. परिस्थिती सामान्य होत असल्याने कार्यकर्ते पुन्हा कार्यालयात जात आहेत. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख हसीना या भारतातून सातत्याने आपल्या नेत्यांच्या संपर्कात आहेत आणि त्यांनीच कार्यकर्त्यांना पुन्हा सक्रिय होण्याचे आदेश दिले आहेत. हसीना यांच्या पुनरागमनासाठी ही एक प्रकारे ग्राउंड लेव्हल तयारी असल्याचे मानले जात आहे.

बीएनपीचे छुपे समर्थन?

काही स्थानिक रिपोर्ट्सनुसार, निवडणुकीपूर्वी जमात-ए-इस्लामी आणि बीएनपीच्या काही नेत्यांनी अवामी लीगच्या स्थानिक नेत्यांशी संपर्क साधला होता. निवडणुकीत सहकार्य केल्यास किंवा शांत राहिल्यास नंतर कार्यालये उघडण्याची मुभा दिली जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. पंचगडमध्ये तर एका बीएनपी नेत्याच्या उपस्थितीत अवामी लीगचे ऑफिस उघडतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामुळे राजकीय खळबळ माजली आहे.

मुलुखात मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारनंतर आता तारिक रहमान यांचे सरकार आले आहे. मात्र, अवामी लीगची ही वाढती सक्रियता नवीन सरकारसाठी डोकेदुखी ठरणार की हे शांततेचे संकेत आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. शेख हसीना यांना आधीच बांगलादेशातील न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे, त्यामुळे त्यांचे प्रत्यक्ष पुनरागमन कठीण असले तरी, त्यांच्या पक्षाचे अस्तित्व मात्र पुन्हा दिसू लागले आहे.

Web Title : बांग्लादेश: अवामी लीग के कार्यालय खुले, क्या शेख हसीना की वापसी का संकेत?

Web Summary : बीएनपी की चुनावी जीत के बाद, बांग्लादेश में अवामी लीग के कार्यालय फिर से खुल रहे हैं, जिससे शेख हसीना की संभावित वापसी की अटकलें तेज हो गई हैं। चुनौतियों के बावजूद, पार्टी की नई सक्रियता भविष्य के राजनीतिक परिदृश्य और बीएनपी के साथ संभावित समझौते के बारे में सवाल उठाती है।

Web Title : Bangladesh: Awami League Reopens Offices, Hinting at Sheikh Hasina's Return?

Web Summary : Following BNP's election win, Awami League offices are reopening in Bangladesh, fueling speculation about Sheikh Hasina's potential return. Despite facing challenges, the party's renewed activity raises questions about the future political landscape and a possible deal with BNP.