मृत्यूच्या दारातून प्रेमाच्या बंधनात! ज्यानं प्राण वाचवले, त्याच ड्रायव्हरशी केलं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 08:06 IST2025-07-24T08:05:29+5:302025-07-24T08:06:03+5:30

ज्या रेल्वे ड्रायव्हरनं शार्लटचा जीव वाचवला होता, त्याच डेव्हशी शेवटी तिनं लग्न केलं. त्या दोघांना आता तीन मुलंही आहेत.

From death's door to love! She married the driver who saved her life | मृत्यूच्या दारातून प्रेमाच्या बंधनात! ज्यानं प्राण वाचवले, त्याच ड्रायव्हरशी केलं लग्न

मृत्यूच्या दारातून प्रेमाच्या बंधनात! ज्यानं प्राण वाचवले, त्याच ड्रायव्हरशी केलं लग्न

वर्ष २०१९च्या उन्हाळ्यातील इंग्लंडमधली गोष्ट. त्या दिवशी शार्लट अतिशय अस्वस्थ होती. एका हॉस्पिटलमध्ये ती नर्स होती आणि आपल्या ड्यूटीवर निघाली होती. अचानक वेस्ट यॉर्कशायर रेल्वेस्टेशनच्या दिशेनं ती निघाली आणि रेल्वे रुळावरून चालायला लागली. आत्महत्या करण्याचा निर्णय तिनं घेतला होता.

गेल्या काही दिवसांपासून असेच विचार तिच्या डोक्यात येत होते. त्या दिवशी मात्र तिनं खरोखरच आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. पाठीमागून रेल्वे येत होती, रेल्वेच्या ड्रायव्हरला रुळावर कोणीतरी व्यक्ती असल्याचं लांबून दिसलं. तो जोरजोरात हॉर्न देत होता, जिवाच्या आकांतानं रेल्वेचा वेग कमी करण्याचा प्रयत्न करीत होता. तिच्या आणि त्याच्या सुदैवानं रेल्वेखाली ती चिरडली जाण्याच्या काही क्षण आणि काही अंतर आधी रेल्वे थांबवण्यात ड्रायव्हरला यश आलं. 

ड्रायव्हर रेल्वेतून खाली उतरला. कुठलाही त्रागा न करता, न चिडता तो शार्लटजवळ गेला, आस्थेनं तिची विचारपूस केली आणि म्हणाला, ‘माझं नाव डेव्ह. तुम्हाला बरं नाही का? तुमचा आजचा दिवस फार वाईट गेला का?’ तिनंही हो म्हटलं. त्यावर डेव्ह म्हणाला, ‘ठीक आहे, तुम्हाला बरं वाटेपर्यंत आपण थोडावेळ बोलूया.’ काही वेळातच शार्लट शांत, नॉर्मल झाली. त्यानंतर डेव्हनं त्याच रेल्वेत तिला बसवलं आणि पुढच्या स्किप्टन स्टेशनला सुरक्षितपणे पोलिसांच्या स्वाधीन केलं. 

शार्लट सांगते, डेव्हमुळेच माझा जीव वाचला; पण त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं, मी रेल्वे रुळावर कशी गेले, डेव्हनं मला कसं वाचवलं, हे मला काहीच आठवत नाही; कारण तेव्हा मी भानावरच नव्हते. आपण त्याचे साधे आभारही मानले नाहीत, याची शार्लटला चुटपूट लागून राहिली. मग तिला एक आयडिया सुचली. तिनं स्थानिक फेसबुक ग्रुपवर यासंबंधी आवाहन केलं. 

नॉर्दर्न रेल्वेत काम करणाऱ्या डेव्हच्या एका सहकाऱ्यानं शार्लटचं हे आवाहन पाहिलं आणि त्यानं डेव्हचा फोन नंबर शार्लटला दिला. शार्लटनं डेव्हला एक मेसेज पाठवला. त्यावर त्यानंही प्रत्युत्तर दिलं, ‘तुम्ही सुखरूप आहात हे पाहून आनंद वाटला. अशाच आनंदी राहा.’ त्यानंतर मग ते दोघंही एकमेकांना मेसेज करू लागले. दोन महिन्यांनी कॉफी पिण्याच्या निमित्तानं ते एकमेकांना भेटले आणि त्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या. 

या कहाणीत आणखी एक ट्विस्ट आहे. काही दिवसांनंतर डेव्हची पाठ खूप दुखायला लागली; पण त्यानं त्याकडे दुर्लक्ष केलं. त्याचं म्हणणं होतं, जवळपास १०-१२ वर्षे मी रेल्वेच्या थंडगार फरशीवर इंजिनच्या दुरुस्तीचं काम केलं आहे, पाठीवर सामान वाहून नेलं आहे आणि त्यामुळेच माझ्या पाठदुखीला सुरुवात झाली आहे; पण शार्लटनं त्याचं काहीएक ऐकलं नाही आणि त्याला डॉक्टरांकडे घेऊन गेली. तपासणीत डेव्हला अंडाशयाचा कर्करोग असल्याचं निष्पन्न झालं. डॉक्टरांचं म्हणणं होतं, वेळेवर उपचार झाले नसते, तर डेव्ह जगू शकला नसता! 

आपले प्राण वाचवल्याचं श्रेय दोघंही एकमेकांना देतात. दिवसेंदिवस त्यांच्यातलं प्रेम वाढतच गेलं. ज्या रेल्वे ड्रायव्हरनं शार्लटचा जीव वाचवला होता, त्याच डेव्हशी शेवटी तिनं लग्न केलं. त्या दोघांना आता तीन मुलंही आहेत.

Web Title: From death's door to love! She married the driver who saved her life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.