इस्रायलशी होणार मुक्त व्यापार करार, विशेष धोरणात्मक भागीदारीचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 10:01 IST2026-02-27T09:59:13+5:302026-02-27T10:01:00+5:30

मोदींनी 'बुक ऑफ नेम्स हॉल'लाही भेट दिली. येथे नरसंहारात शहीद झालेल्या लाखो लोकांच्या स्मृती जतन करण्यात आल्या आहेत. व्यापार, कृषी, ऊर्जा, सायबर स्पेस आणि डिजिटल पेमेंटचे सामंजस्य करार झाले.

Free trade agreement with Israel, decision on special strategic partnership | इस्रायलशी होणार मुक्त व्यापार करार, विशेष धोरणात्मक भागीदारीचा निर्णय

इस्रायलशी होणार मुक्त व्यापार करार, विशेष धोरणात्मक भागीदारीचा निर्णय

जेरुसलेम : भारत आणि इस्रायलने आपल्या संबंधांना 'विशेष धोरणात्मक भागीदारी' स्तरावर नेण्याचा गुरुवारी ऐतिहासिक निर्णय घेतला. दोन्ही देशांनी लवकरच परस्पर फायदेशीर 'मुक्त व्यापार करारावर' स्वाक्षरी करण्याचेही मान्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यातील प्रदीर्घ चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला. 

दोन्ही देशांमध्ये व्यापार, कृषी, ऊर्जा, सायबर स्पेस आणि डिजिटल पेमेंट या क्षेत्रांत अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. तसेच 'भारत-मध्य पूर्व-युरोप आर्थिक कॉरिडॉर' आणि 'आयटूयूटू' या सहकार्यावरही चर्चा झाली.

महत्त्वाचे करार

दोन्ही देशांमध्ये लष्करी उपकरणांचा संयुक्त विकास आणि उत्पादन, इस्रायलमध्ये आता भारतीय 'यूपीआय' (डिजिटल पेमेंट) वापरण्याबाबत करार झाला. तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम आणि महत्त्वपूर्ण खनिजांच्या क्षेत्रात सहकार्यासाठी 'भारत-इस्रायल क्रिटिकल अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजीज' भागीदारीचीही घोषणा करण्यात आली.

मोदींची 'याद वाशेम' स्मारकाला भेट; वाहिली श्रद्धांजली

जेरुसलेममधील 'याद वाशेम' या जागतिक होलोकॉस्ट स्मृती केंद्राला गुरुवारी मोदींनी भेट दिली. दुसऱ्या महायुद्धादरम्यान नाझी जर्मनीकडून झालेल्या ज्यू नरसंहारात (होलोकॉस्ट) प्राण गमावलेल्या सुमारे ६० लाख ज्यू बांधवांना त्यांनी यावेळी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. ज्यू प्रथेनुसार, मोदींनी पीडितांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तिथे एक दगडही ठेवला.

मोदींनी 'बुक ऑफ नेम्स हॉल'लाही भेट दिली. येथे नरसंहारात शहीद झालेल्या लाखो लोकांच्या स्मृती जतन करण्यात आल्या आहेत. या भेटीत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू मोदींसोबत उपस्थित होते. दोघांनी 'हॉल ऑफ नेम्स'ला भेट दिली. यावेळी नेतन्याहू यांनी मोदींना नरसंहारात बळी पडलेल्या आपल्या पत्नीच्या (सारा नेतन्याहू) नातेवाइकांची नावे दाखवली. १९५३ मध्ये स्थापन झालेल्या या स्मारकाला पंतप्रधान म्हणून मोदींनी दिलेली ही दुसरी भेट आहे.

गाझा शांतता कराराला भारताचा जोरदार पाठिंबा

मोदींनी गाझा शांतता उपक्रमाला जोरदार पाठिंबा दर्शवला. मानवता कधीही संघर्षाचा बळी ठरता कामा नये. शांततेचा मार्ग गाझा शांतता योजनेतून निर्माण झाला असून, भारताचा याला पाठिंबा असल्याचे मोदी म्हणाले.

'दहशतवादाविरुद्ध 'खांद्याला खांदा' लावून लढू'

जगात दहशतवादाला स्थान नाही, यावर भारत आणि इस्रायलचे एकमत आहे. दहशतवाद आणि त्याचे समर्थक यांच्या विरोधात आम्ही खांद्याला खांदा लावून उभे आहोत आणि भविष्यातही उभे राहू, असे मोदींनी ठामपणे सांगितले.

हझोंगना भारतभेटीचे निमंत्रण

मोदींनी इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष आयॉक होंग यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. उभय नेत्यांमध्ये शिक्षण, स्टार्टअप, नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि कनेक्टिव्हिटी यावर फलदायी चर्चा झाली. त्यानंतर मोदींनी हझोंग यांना भारतभेटीचे आग्रही निमंत्रण दिले.

Web Title : भारत और इजरायल में मुक्त व्यापार समझौता, रणनीतिक भागीदारी मजबूत।

Web Summary : भारत और इजरायल ने रणनीतिक साझेदारी को बढ़ाया, मुक्त व्यापार समझौते पर सहमति। व्यापार, कृषि, ऊर्जा और डिजिटल भुगतान पर चर्चा हुई। संयुक्त सैन्य विकास, इजरायल में भारतीय यूपीआई और एआई में सहयोग पर ध्यान केंद्रित किया गया।

Web Title : India and Israel Strengthen Ties with Free Trade Agreement, Partnership.

Web Summary : India and Israel elevate ties to a strategic partnership, agreeing to a free trade agreement. Discussions spanned trade, agriculture, energy, and digital payments. Focus on joint military development, Indian UPI in Israel, and collaboration in AI and critical technologies marked the strengthened alliance.