टेलिग्रामच्या सीईओला अटक केल्याची मोठी किंमत फ्रान्सने मोजली; राफेलची डील रद्द, युएई नाराज
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 19:27 IST2024-08-28T19:27:05+5:302024-08-28T19:27:30+5:30
फ्रान्सकडून 80 राफेल लढाऊ विमाने घेतली जाणार होती. या खरेदीचा करार स्थगित केला आहे.

टेलिग्रामच्या सीईओला अटक केल्याची मोठी किंमत फ्रान्सने मोजली; राफेलची डील रद्द, युएई नाराज
टेलिग्रामचे सीईओ पावेल ड्युरोव यांना अटक झाल्यानंतर संयुक्त अरब अमिरातने फ्रान्सकडून खरेदी केली जाणारी राफेल विमानांची डील रद्द केली आहे. इराणच्या मेहर न्यूजने हे वृत्त दिले आहे. बुधवारी युएईने हा निर्णय घेतल्याचे यात म्हटले आहे.
फ्रान्सकडून 80 राफेल लढाऊ विमाने घेतली जाणार होती. या खरेदीचा करार स्थगित केला आहे. फ्रेंच एरोस्पेस कंपनी डसॉल्टशी युएईने २०२१ मध्ये करार केला होता. ही विमाने 2027 पर्यंत देण्यात येणार होती. ड्युरोव्हला अटक झाल्याने युएई फ्रान्ससोबतच्या सर्व प्रकारचे लष्करी आणि तांत्रिक सहकार्य संपवण्याचा विचार करत आहे.
टेलिग्रामचा सीईओ रशियन आहे. टेलिग्रामच्या स्थापनेनंतर पावेल ड्युरोव अनेक देशांमध्ये राहिला होता. यानंतर त्याने २०१७ मध्ये दुबईत टेलिग्रामचे मुख्यालय स्थापन केले होते. याचवेळी त्याला युएईची नागरिकता मिळाली होती. यानंतर २०२१ मध्ये त्याने फ्रान्सची नागरिकताही मिळविली.
आम्ही ड्युरोवच्या प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. आमच्या नागरिकांची सुरक्षा आणि त्यांच्या हितसंबंधांचे संरक्षण युएईसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, अशी प्रतिक्रिया युएईने दिली आहे. बाल लैंगिक शोषण सामग्रीची देवाणघेवाण, अंमली पदार्थांची तस्करी आणि संघटित गुन्हेगारीला प्रोत्साहन देण्यासाठी टेलिग्रामचा वापर केल्याचा आरोप फ्रान्सने केला होता. या प्रकरणात फ्रान्स ड्युरोव्हला केवळ चारच दिवस तुरुंगात ठेवू शकणार आहे. अटकेपूर्वी ड्युरोव्ह युएईमध्येच राहत होता.