स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 10:29 IST2025-11-07T10:28:39+5:302025-11-07T10:29:33+5:30
Man finds Gold: फ्रान्समध्ये स्विमिंग पूलसाठी खोदकाम करताना जमिनीखाली सापडला ₹७ कोटींचा सोन्याचा खजिना! सोन्याची बिस्किटे आणि नाणी. हा जैकपॉट त्या व्यक्तीला कसा मिळाला, वाचा.

स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
नशीब कधी कोणाला साथ देईल सांगता येत नाही! फ्रान्समध्ये एका व्यक्तीच्या बाबतीत असेच घडले आहे. आपल्या घराच्या बागेत स्विमिंग पूल बांधण्यासाठी खोदकाम सुरू असताना त्याला जमिनीखाली सात कोटी रुपये (सुमारे ७००,००० युरो) एवढ्या किंमतीचा सोन्याचा गुप्त खजिना सापडला आहे.
महत्वाचे म्हणजे हा खजिना एका प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळलेला होता, ज्यामध्ये सोन्याची पाच मोठी बिस्किटे आणि असंख्य सोन्याची नाणी भरलेली होती. ही घटना ल्योनजवळच्या न्यूविले-सुर-साओन शहरात घडली. प्लॅस्टीकची पिशवी म्हणजे हे अलिकडच्या काळातीलच कोणीतरी तस्कराने किंवा चोराने लपविलेले असावे असा अंदाज आहे.
घराच्या मालकाने तात्काळ याची माहिती स्थानिक सांस्कृतिक विभाग आणि प्रशासनाला दिली. प्रशासनाने या खजिन्याची कसून तपासणी केली. तपासणीअंती, या सोन्याला कोणतेही पुरातत्वीय महत्त्व नसल्याचे स्पष्ट झाले. यामुळे ही संपत्ती जमीन मालकाच्या स्वाधीन करण्यात आली आहे.
सर्वाधिक महत्त्वाचे काय...
अधिकाऱ्यांनी अखेरीस हा खजिना घराच्या मालकाची वैयक्तिक मालमत्ता असल्याचा निर्णय दिला आहे. याचा अर्थ, ही प्रचंड संपत्ती आता त्या भाग्यवान व्यक्तीची झाली आहे. विशेष म्हणजे, हे सोने येथे कसे आले, याची कोणतीही माहिती मिळू शकली नाही, कारण जमिनीच्या मागील मालकाचा मृत्यू झाला आहे. अचानक मिळालेल्या या जॅकपॉटमुळे त्या व्यक्तीच्या जीवनात मोठा आणि अनपेक्षित बदल झाला आहे.