श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांना सरकारी निधीचा गैरवापर केल्याच्या आरोपाखाली शुक्रवारी अटक करण्यात आली. ७६ वर्षीय विक्रमसिंघे यांना गुन्हे अन्वेषण विभाग मुख्यालयात अटक करण्यात आली. दरम्यान, २० सप्टेंबर २०२४ रोजी त्यांची पत्नीच्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहण्यासाठी त्यांनी सरकारी खर्चाने इंग्लंडला प्रवास केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांची चौकशी केली होती. विक्रमसिंघे अधिकृत दौऱ्यावरून अमेरिकेहून परत येत असताना, आपल्या पत्नीच्या खासगी कार्यक्रमासाठी सरकारी निधीचा वापर करून ब्रिटनला गेले, असा आरोप त्यांच्यावर आहे. जुलै २०२२ ते सप्टेंबर २०२४ या काळात विक्रमसिंघे यांनी श्रीलंकेचे राष्ट्रपती म्हणून काम केले. त्यांना देशाच्या आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचे श्रेय दिले जाते. यापूर्वी त्यांनी सहा वेळा श्रीलंकेचे पंतप्रधानपदही भूषवले आहे.