‘उडत्या’ मिनेल्ले फारुकीची पाकिस्तानात चर्चा; ठरली देशातील सर्वात युवा पायलट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 07:57 IST2025-07-23T07:57:41+5:302025-07-23T07:57:56+5:30
पाकिस्तानातील १८ वर्षीय मिनेल्ले फारुकी या तरुणीनं तिथं नुकताच एक इतिहास घडवला आहे. पाकिस्तानातील सर्वांत कमी वयाची ती युवा कमर्शिअल पायलट बनली आहे.

‘उडत्या’ मिनेल्ले फारुकीची पाकिस्तानात चर्चा; ठरली देशातील सर्वात युवा पायलट!
पाकिस्तान हा एक असा देश आहे, जिथून चांगली बातमी कधी अपवादानंच मिळते. अन्यथा तिथे कायम खून, हाणामाऱ्या, दहशतवाद, कर्जाच्या डोंगरात बुडालेला देश, भिकेला लागलेले नागरिक, खाण्या-पिण्याची चिंता, हताश झालेले नागरिक, इतर देशांनी, लष्करानं केलेली कुरघोडी, जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं दिलेली तंबी... अशा नकारात्मक बातम्यांनीच हा देश कायम गाजत असतो.
पण तिथून नुकतीच एक चांगली बातमी आली आहे, तीही दहशतवाद आणि राजकारणापलीकडची. सर्वसामान्य नागरिकांना त्यातल्या त्यात सुखावणारी. पाकिस्तानातील १८ वर्षीय मिनेल्ले फारुकी या तरुणीनं तिथं नुकताच एक इतिहास घडवला आहे. पाकिस्तानातील सर्वांत कमी वयाची ती युवा कमर्शिअल पायलट बनली आहे. पाकिस्तानसाठी ही बातमी खरंच आशादायक आणि अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण आहे. पाकिस्तान हा आधीच पारंपरिक, पुरुषसत्ताक संस्कृती असलेला देश. तेथील महिलांवर खूप बंधनं आहेत. शिक्षणापासून ते नोकऱ्यांपर्यंत आणि महिलांच्या चालण्या-बोलण्याबाबत असलेल्या सामाजिक संकेतांबाबत. अशा परिस्थितीत तेथील एक तरुण मुलगी देशातील सर्वांत युवा पायलट बनते ही गोष्ट त्यांच्यासाठी खरंच महत्त्वाची.
सुदैवानं मिनेल्लेच्या पालकांनीही तिचे पंख कापले नाहीत आणि तिला आपल्या मनाप्रमाणे स्वच्छंद जगू दिलं. त्याचाच परिपाक म्हणजे तिचं हे यश. आपण आकाशात विहार करावा, उंचच उंच उडावं हे लहानपणापासूनच मिनेल्लेचं स्वप्न. विमानतळापासून जवळच राहत असल्यानं ती रोज विमानं उडताना आणि लँड होताना पाहायची. विमानाचा आवाज आला, आकाशात विमान दिसलं की आपोआप तिची नजर वर जायची. कोणतंही विमान, मग ते आकाशात उड्डाण घेणारं असो किंवा जमिनीवर लँड होणारं असो, जोपर्यंत ते नजरेआड होत नाही, तोपर्यंत ती त्या विमानाकडे पाहत राहायची. एक दिवस आपणही असंच विमानात बसून उडायचं आणि विमान चालवायचं ही तिची इच्छा त्याचवेळी मनात ठाण मांडून बसली. त्यामुळे ती स्वत:हूनच विमानांचा अभ्यास करायला लागली. त्यानंतर रीतसर तिनं विमान उड्डाणाचं प्रशिक्षणही घेतलं.
त्यासाठी तिच्या घरच्यांनी तिला कोणतीही आडकाठी केली नाही, हे तर तिचं सुदैवच; पण तिचा हा प्रवास सुखेनैव झाला असं नाही. पालकांनी जरी नाही, तरी समाजानं, नातेवाइकांनी, आजूबाजूच्या लोकांनी तिच्या या हवाई स्वप्नांना सुरुंग लावायचा प्रयत्न केलाच. तिच्या आई-वडिलांनाही त्यावरून सतत ऐकावं लागलं. ‘मुलगी असूनही ही थेरं कशासाठी? सर्वसामान्य मुली जे, जितकं आणि जसं शिक्षण घेतात तसं घ्यायला काय झालं? मुलीच्या जातीला असं शोभत नाही, वगैरे, वगैरे..
पण ना तिच्या आई-वडिलांनी या टोमण्यांकडे लक्ष दिलं, ना स्वत: मिनेल्लेनं अशा सल्ल्यांना भीक घातली.. उलट याबाबत समाजाकडून जेवढा नकार तिला ऐकायला मिळाला, तेवढा तिचा निर्धार आणखी पक्का होत गेला. इतका की विमानोड्डाणासंदर्भात एकाच वर्षात तब्बल १३ परीक्षा तिनं पास केल्या! सगळ्या आव्हानांना ती पुरून उरली! सध्या ती एअर ॲम्ब्युलन्स ऑपरेट करते, पण भविष्यात तिला एअरलाइन ट्रान्स्पोर्ट पायलट बनून मोठमोठी विमानं चालवायची आहेत! ती म्हणते, विमानोड्डाणासंदर्भात प्रत्येक गोष्ट येणं हे माझ्या आयुष्याचं स्वप्न आहे!