जपानमध्ये एका आजाराने रुग्णालये फुल्ल, आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण; सरकारकडून महामारी घोषित
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 16:36 IST2025-10-14T16:36:02+5:302025-10-14T16:36:26+5:30
जपानमध्ये फ्लूच्या साथीने हाहाकार उडवला असून रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

जपानमध्ये एका आजाराने रुग्णालये फुल्ल, आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण; सरकारकडून महामारी घोषित
Japan Flu Outbreak: कोविड-१९ च्या महामारीतून जग सावरत असताना भारताच्या मित्र राष्ट्रावर मोठं संकट आले आहे. जपान सध्या वेगाने वाढणाऱ्या फ्लूच्या संसर्गाशी झुंजत आहे. त्यामुळ ४,००० हून अधिक लोक रुग्णालयात दाखल आहेत. सरकारने फ्लूच्या साथीला अधिकृतपणे देशव्यापी साथीचा रोग म्हणून जाहीर केले आहे. सध्या जपानमधील परिस्थिती कमी-अधिक प्रमाणात कोरोना साथीच्या काळात लागू केलेल्या लॉकडाऊन दरम्यान दिसणारी परिस्थितीसारखीच आहे.
जपानमधल्या एका नव्या आरोग्य संकटाने सध्या चिंता वाढवली आहे. देशात इन्फ्लूएंझा म्हणजेच फ्लूच्या रुग्णांमध्ये अभूतपूर्व वाढ झाली आहे, ज्यामुळे जपान सरकारने अधिकृतपणे देशव्यापी महामारी घोषित केली आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, जपानमध्ये फ्लूचा हंगाम सहसा नोव्हेंबर किंवा डिसेंबरच्या अखेरीस सुरू होतो. मात्र, यावर्षी हा प्रादुर्भाव पाच आठवडे लवकर सुरू झाला. रुग्णालये रुग्णांनी भरून गेली आहेत, ज्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण आला आहे. रुग्णालये पूर्णपणे भरलेली असून आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवत आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या काही आठवड्यांमध्ये ४,००० हून अधिक लोकांना इन्फ्लूएंझावर उपचार घ्यावे लागले आहेत. ही रुग्णसंख्या मागील आठवड्याच्या तुलनेत चार पटीने वाढली आहे. २९ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या कालावधीत, इन्फ्लूएंझावर उपचार घेतलेल्या रुग्णांची संख्या ६,००० पेक्षा जास्त झाली. या वाढत्या प्रादुर्भावामुळे टोकियो, ओकिनावा आणि कागोशिमासह २८ प्रांतांमध्ये १३५ हून अधिक शाळा आणि चाइल्डकेअर सेंटर्स तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्यात आली आहेत.
आरोग्य तज्ज्ञांनी या विषाणूबद्दल गंभीर इशारा दिला आहे. तज्ज्ञांच्या मते, हा फ्लूचा विषाणू पूर्वीपेक्षा अधिक वेगाने विकसित होत आहे आणि अधिक सहजपणे पसरत आहे. जागतिक हवामान बदलांमुळे फ्लूचा हंगाम लवकर सुरू होणे आता सामान्य असू शकते, असेही मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. जरी येथील फ्लूची परिस्थिती इतर देशांपेक्षा वेगळी असली तरी, सध्याच्या परिस्थिती पाहता, मास्क घालणे आणि नियमितपणे हात धुणे यासारखे उपाय संसर्ग रोखण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात.
भारतासाठी धोक्याची घंटा?
जरी हा हंगामी फ्लूचा प्रादुर्भाव असला तरी, त्याचे प्रमाण आणि वेळेमुळे भारतासह इतर देशांसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. विशेषतः हिवाळ्याचा काळ जवळ येत असल्याने, श्वसनाच्या संसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे. जपानमधील आरोग्य अधिकारी आता नागरिकांना, विशेषत: लहान मुले, वृद्ध आणि दुर्बळ आरोग्य असलेल्यांना तात्काळ फ्लूची लस घेण्याचे आवाहन करत आहेत. तसेच, मास्कचा वापर करणे आणि नियमित हात धुणे यांसारख्या खबरदारीच्या उपाययोजनांचे पालन करण्यास सांगण्यात आले आहे.