ब्रह्मपुत्रेच्या काठी हिंदूंच्या रक्ताचा पूर! २०० हून अधिक हल्ले, बांगलादेशातील 'या' जिल्ह्यात हिंदूंचे अस्तित्व धोक्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 08:42 IST2025-12-30T08:41:25+5:302025-12-30T08:42:46+5:30
बांगलादेशातील 'हा' जिल्हा सध्या हिंदू अल्पसंख्याकांसाठी 'मृत्यूचा सापळा' ठरत आहे.

ब्रह्मपुत्रेच्या काठी हिंदूंच्या रक्ताचा पूर! २०० हून अधिक हल्ले, बांगलादेशातील 'या' जिल्ह्यात हिंदूंचे अस्तित्व धोक्यात
शेख हसीना यांनी बांगलादेश सोडल्यानंतर तिथे उसळलेल्या हिंसाचाराने आता भीषण रूप धारण केले आहे. विशेषतः बांगलादेशातील मयमनसिंह हा जिल्हा सध्या हिंदू अल्पसंख्याकांसाठी 'मृत्यूचा सापळा' ठरत आहे. नुकतीच येथे दीपू चंद्र दास या हिंदू तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली, ज्याचे पडसाद जगभरात उमटले आहेत. एकेकाळी हिंदू बहुल असलेल्या या भागात आता हिंदूंचे अस्तित्वच धोक्यात आले असून, अवघ्या काही दिवसांत येथे २०० हून अधिक हल्ले झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
७८ टक्क्यांवरून ९ टक्क्यांवर घसरण
मयमनसिंह जिल्ह्याचा इतिहास पाहिला तर अंगावर काटा येतो. १९३७ च्या सुमारास या भागात तब्बल ७८ टक्के हिंदू लोकसंख्या होती. मात्र, आज ही संख्या अवघ्या ९ टक्क्यांवर येऊन ठेपली आहे. ब्रह्मपुत्रा नदीच्या काठी वसलेल्या या जिल्ह्यातून हिंदूंना पद्धतशीरपणे बाहेर काढले जात असल्याचा आरोप होत आहे. ५१ लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या या जिल्ह्यात आता ९० टक्के लोकसंख्या मुस्लिमांची आहे.
दीपू दासची हत्या अन् भयावह वास्तव
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओने मयमनसिंहमधील परिस्थिती किती भीषण आहे, हे जगाला दाखवून दिले. दीपू चंद्र दास याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते, मात्र जमावाने पोलिसांच्या तावडीतून त्याला ओढून काढले आणि त्याची हत्या केली. या घटनेने बांगलादेशातील कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे काढले आहेत. २०२५ सालात आतापर्यंत या जिल्ह्यात मंदिरांवर आणि हिंदूंवर १० मोठे हल्ले झाले आहेत, तर ऑगस्ट २०२४ मध्ये एकाच महिन्यात १८३ ठिकाणी हिंसक घटना घडल्या.
हिंदूंचे सांस्कृतिक केंद्र आता निशाण्यावर
मयमनसिंहमध्ये बांगलादेशातील सर्वात मोठे दुर्गा मंदिर (दुर्गाबारी) आणि रामकृष्ण परमहंस यांचे मंदिर आहे. ऐतिहासिकदृष्ट्या हे ठिकाण हिंदूंचे गड मानले जाते. मात्र, हेच बलस्थान आता त्यांच्यासाठी शाप ठरत आहे. ढाकासारखी सुरक्षा येथे उपलब्ध नसल्याने कट्टरपंथीयांचे फावते आहे. १९७१ मध्ये पाकिस्तानपासून मुक्त झाल्यानंतर येथे हिंदूंची मोठी ताकद होती, पण आता त्याच हिंदू समाजाला तिथे परके ठरवले जात आहे.
सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
शेख हसीना यांच्या सत्तांतरानंतर मयमनसिंह जिल्हा हिंसाचाराचे केंद्र बनला आहे. प्रशासनाचे दुर्लक्ष आणि पोलिसांचे हतबल होणे यामुळे येथील उरल्यासुरल्या हिंदू कुटुंबांमध्ये भीतीचे सावट आहे. "आम्ही राहायचे कुठे आणि जायचे कुठे?" असा आर्त सवाल येथील हिंदू नागरिक विचारत आहेत.