आधी शुल्क लादले, मग माघार घेतली; डोनाल्ड ट्रम्प यांना कशाची चिंता? अब्जो डॉलर्सचा खेळ...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 17:23 IST2025-02-05T17:23:07+5:302025-02-05T17:23:28+5:30
डोनाल्ड ट्रम्प यांनी शुल्क लादण्याचा इशारा दिला होता, परंतु आता माघार घेतली आहे.

आधी शुल्क लादले, मग माघार घेतली; डोनाल्ड ट्रम्प यांना कशाची चिंता? अब्जो डॉलर्सचा खेळ...
Donald Trump Tariff War : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा, मेक्सिको आणि चीनवर शुल्क लादण्याचा इशारा दिला होता. परंतु, आता ट्रम्प यांनी आपली भूमिका बदलली असून, कॅनडा आणि मेक्सिकोला एका महिन्यासाठी शुल्कातून सूट दिली असून, या दोन्ही देशांसोबतचा प्रश्न वाटाघाटीद्वारे सोडवला जाणार आहे. तर, दुसरीकडे त्यांनी चीनवर 10 टक्के शुल्क लादले आहे. विशेष म्हणजे, अमेरिका आपल्या एकूण व्यवसायापैकी 40 टक्के व्यवसाय कॅनडा, मेक्सिको आणि चीनसोबत करते. अशा स्थितीत ट्रम्प यांचे शुल्क लादण्यामागचे राजकारण समजण्यापलीकडचे नाही.
निवडणुकीपूर्वी आश्वासन दिले, पण...
निवडणुकीच्या प्रचारादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी शुल्क लादण्याचा इशारा दिला होता, परंतु जिंकल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की त्यांनी निवडणुकीत दिलेले आश्वासन लागू करणे कठीण आहे. या कारणास्तव ट्रम्प यांनी चीनवर शुल्क लावले, पण कॅनडा आणि मेक्सिकोला यातून वगळले.
कॅनडा-मेक्सिकोला दिलासा देण्यामागे कारण
डोनाल्ड ट्रम्प यांच्या माघारीचे मुख्य कारण म्हणजे, अमेरिका-कॅनडा आणि अमेरिका-मेक्सिको यांच्यातील कोट्यवधी डॉलर्सचा व्यापार. अल जझीराच्या अहवालानुसार, जानेवारी 2024 ते नोव्हेंबर 2024 दरम्यान अमेरिका आणि मेक्सिकोमध्ये 776 अब्ज डॉलर्सचा व्यापार झाला. ज्यामध्ये अमेरिकेने मेक्सिकोला $309 अब्ज किमतीचा माल निर्यात केला अन् $476 अब्ज किमतीचा माल आयात केला.
दुसरीकडे, जानेवारी 2024 ते नोव्हेंबर 2024 दरम्यान अमेरिका आणि कॅनडामध्ये $700 अब्जचा व्यापार झाला आहे. यापैकी अमेरिकेने कॅनडाला $322 अब्ज किमतीचा माल निर्यात केला आहे आणि अमेरिकेने $377 अब्ज किमतीचा माल कॅनडातून आयात केला आहे. अमेरिकेने कॅनडातून पेट्रोलियम उत्पादने, नैसर्गिक वायू, वीज, युरेनियम, कार, यंत्रसामग्री, धातू, सोने, धान्य आणि बियाणे आयात केली आहेत.
यामुळे माघार...
अमेरिकेने कॅनडा आणि मेक्सिकोवर शुल्क लादले, तर कॅनडा आणि मेक्सिकोदेखील त्यांच्यावर शुल्क लादून बदला घेऊ शकतात. कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो म्हणाले होते की, डोनाल्ड ट्रम्प यांनी आमच्यावर शुल्क लादले, तर आम्ही अमेरिकेवर 25 टक्के शुल्क लादू. याशिवाय, मेक्सिकोनेही अमेरिकेवर 25 टक्के शुल्क लादण्याची घोषणा केली होती. यामुळेच ट्रम्प यांनी माघार घेतल्याचे बोलले जात आहे.