आधी लोकांची फसवणूक केली, नंतर तुरुंगात जायला लागू नये म्हणून महिलेनं काय शक्कल लढवली वाचाच!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 14:20 IST2025-08-22T14:16:46+5:302025-08-22T14:20:17+5:30
Viral News : तुरुंगातील शिक्षा टाळण्यासाठी एका महिलेने अवलंबलेल्या अनोख्या मार्गाने सर्वांनाच धक्का बसला आहे.

आधी लोकांची फसवणूक केली, नंतर तुरुंगात जायला लागू नये म्हणून महिलेनं काय शक्कल लढवली वाचाच!
चीनमध्ये तुरुंगातील शिक्षा टाळण्यासाठी एका महिलेने अवलंबलेल्या अनोख्या मार्गाने सर्वांनाच धक्का बसला आहे. शांक्सी प्रांतातील एका महिलेने फसवणुकीच्या गुन्ह्यात मिळालेली पाच वर्षांची शिक्षा टाळण्यासाठी चार वर्षांत तीन वेळा गर्भवती झाली. मात्र, आता तिची ही क्लुप्ती फोल ठरली असून, तिला उर्वरित शिक्षा भोगण्यासाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. चीनमध्ये या महिलेला चेन होंग या टोपण नावाने ओळखलं जात आहे. या प्रकरणामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू आहे.
नक्की काय आहे प्रकरण?
चेन होंगला डिसेंबर २०२० मध्ये फसवणुकीच्या आरोपाखाली पाच वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. पण तुरुंगात जाण्याऐवजी तिने चीनच्या एका कायद्याचा फायदा घेतला. या कायद्यानुसार, गर्भवती महिला आणि नवजात बालकांची काळजी घेणाऱ्या मातांना तुरुंगाबाहेर शिक्षा भोगण्याची परवानगी आहे. या तरतुदीनुसार, गुन्हेगारांना दर तीन महिन्यांनी गर्भधारणा किंवा आरोग्याशी संबंधित अहवाल सादर करावा लागतो आणि स्थानिक सुधारणा संस्थांद्वारे त्यांची नियमित तपासणी केली जाते.
२०२० ते २०२४ या काळात चेनने एकाच पुरुषासोबत तीन मुलांना जन्म दिला, ज्यामुळे ती वारंवार तुरुंगातील शिक्षा टाळत राहिली. प्रत्येक गर्भधारणेमुळे तिला तुरुंगाबाहेर राहण्याची पात्रता मिळाली, कारण ती एकतर गर्भवती होती किंवा नवजात बाळाची काळजी घेत होती. पण मे २०२५ मध्ये एका नियमित तपासणीदरम्यान, अधिकाऱ्यांना कळलं की चेन तिच्या नवजात बाळासोबत राहत नव्हती, आणि बाळाची कायदेशीर नोंदणी (हुको) तिच्या माजी पतीच्या बहिणीच्या नावावर होती.
तपास आणि शिक्षा
तपासात असंही समोर आलं की चेनने तिच्या पतीला आधीच घटस्फोट दिला होता. तिची पहिली दोन मुलं तिच्या माजी पतीसोबत राहत होती, तर तिसरं बाळ तिने तिच्या माजी पतीच्या बहिणीकडे दिलं होतं. स्थानिक वकिलांनी चेनवर तुरुंगातून वाचण्यासाठी गर्भधारणेचा गैरवापर केल्याचा आरोप केला आणि तिला तुरुंगात पाठवण्याची शिफारस केली. अखेरीस, चेनला तिची उर्वरित शिक्षा (सुमारे एक वर्ष) पूर्ण करण्यासाठी ताब्यात घेण्यात आलं.
सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया
चेन होंगचं प्रकरण सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं, जिथे लोकांनी तिच्या या युक्तीवर आश्चर्य आणि संताप व्यक्त केला. एका युजरने लिहिलं, "त्या तीन मुलांची मला दया येते, कारण त्यांचा जन्म फक्त त्यांच्या आईला तुरुंगातून वाचवण्यासाठी झाला." दुसऱ्या एकाने लिहिलं, "ती हवं तेव्हा गर्भवती होऊ शकते हे पाहून मी थक्क झालो." अनेक लोकांनी चीनी कायद्यातील या त्रुटींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि त्यात सुधारणा करण्याची मागणी केली.
यापूर्वीही असे प्रकार घडले
अशा प्रकारची युक्ती वापरणारी ही पहिली महिला नाही. २००५ मध्ये, एका दुसऱ्या चिनी महिलेने भ्रष्टाचारासाठी मिळालेली जन्मठेपेची शिक्षा टाळण्यासाठी दहा वर्षांत १४ वेळा गर्भवती असल्याचा दावा केला होता, त्यापैकी एक गर्भधारणा खोटी होती. अखेर तिला २०१५ मध्ये तुरुंगात पाठवण्यात आलं होतं.