अखेर दोन आठवड्यांचा युद्धविराम; पण इस्रायलचे लेबनॉनवर हल्ले, इराणने पुन्हा बंद केला ‘होर्मुझ’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 08:15 IST2026-04-09T07:56:44+5:302026-04-09T08:15:24+5:30

युद्ध किंवा युद्धविराम यांपैकी एकाची निवड करावी, असा इराणचा थेट इशारा

Finally a two-week ceasefire; But Israel attacks Lebanon, Iran closes 'Hormuz' again | अखेर दोन आठवड्यांचा युद्धविराम; पण इस्रायलचे लेबनॉनवर हल्ले, इराणने पुन्हा बंद केला ‘होर्मुझ’

अखेर दोन आठवड्यांचा युद्धविराम; पण इस्रायलचे लेबनॉनवर हल्ले, इराणने पुन्हा बंद केला ‘होर्मुझ’

तेहरान: ३९ दिवसांच्या युद्धानंतर अमेरिकेने इराणसोबत दोन आठवड्यांचा युद्धविराम केल्याची घोषणा झाल्यानंतर जगाने सुटकेचा निःश्वास सोडला. मात्र, इस्रायलने लेबनॉनवर भीषण हल्ले सुरूच ठेवल्याच्या रागात इराणने होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद केल्याचे जाहीर केले. आता हा मार्ग पुन्हा सुरू करण्याची मागणी अमेरिकेने केली आहे. अमेरिकेला इस्रायलच्या माध्यमातून सुरू असलेले युद्ध किंवा युद्धविराम यांपैकी एकाची निवड करावी लागेल, असा थेट इशारा इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी दिला आहे.

अमेरिका व इराण २ आठवड्यांच्या शस्त्रसंधीवर सहमत झाले. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ व लष्करप्रमुख आसीफ मुनीर यांच्या आवाहनानंतर हा निर्णय घेण्यात आला, असे ट्रम्प यांनी म्हटले होते. मात्र, युद्धविराम जाहीर होऊन काही तास उलटत नाहीत तोच, इस्रायलने बुधवारी लेबनॉनची राजधानी बैरूतसह विविध भागांवर हवाई हल्ले चढवले. १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणांवर मोठे हल्ले केले गेले. यात २५४ जणांचा मृत्यू झाला असून ८३७ हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत.

इराणने 'भीक' मागितली होती

युद्धविरामासाठी इराणच्या नेतृत्वाने अक्षरशः भीक मागितली. त्यांच्याकडे पर्यायच नव्हता, असा दावा अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी केला. कोणत्याही परिस्थितीत इराणला अणुबॉम्ब तयार करू दिला जाणार नाही. 

शांतता चर्चेसाठी अमेरिकचे व्हान्स शनिवारी पाकिस्तानात

पाकिस्तानने सांगितले की, शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने इस्लामाबादमध्ये शनिवारी चर्चा सुरू होईल. त्यासाठी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. व्हान्स, इराणचे प्रतिनिधी पाकिस्तानात येतील. शांतता प्रस्थापित होण्यास संबंधितांनी युद्धविरामाच्या अटींचे पालन करावे, असे संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी सांगितले.

होर्मुझवर आमचे लष्करी नियंत्रण असेल: इराण

इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी सांगितले की, लष्कराच्या नियंत्रणाखाली होर्मुझ सामुद्रधुनीतून जाण्यास परवानगी दिली जाईल. ही अट मान्य झाली तर जहाजांवर इराण व ओमान दोघेही शुल्क आकारू शकतात. मात्र, या शुल्काला डोनाल्ड ट्रम्प यांनी विरोध दर्शविला आहे. त्यामुळे वाटाघाटीत अडचणी येऊ शकतात.

इराणमधील युरेनियम काढून टाकणारच: इस्रायलचा दावा

लेबनॉनमधील संघर्ष हा स्वतंत्र असून युद्धविराम करारात त्याचा समावेश नाही, असे  ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. इस्रायलनेही हीच भूमिका घेत हिजबुल्लाच्या ठिकाणांवर लक्ष्य साधल्याचा दावा केला. इराणमधील 'समृद्ध युरेनियम' एकतर कराराद्वारे हटवले जाईल किंवा लष्करी बळाचा वापर करून तेथून काढून टाकले जाईल, असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटले आहे.

युद्धविरामानंतरही हल्ले सुरूच; सतर्कतेचे इशारे

युद्धविरामानंतरही मध्य इराणमधील इस्फाहान शहरात मोठे स्फोट झाले. यामुळे इराणमधील एअर डिफेन्स सिस्टम सक्रिय करण्यात आली आहे. युद्धविरामानंतर बहरीन, कुवेत, सौदी अरेबिया, यूएई येथे क्षेपणास्त्र व ड्रोन हल्ले झाले. कुवेतमध्ये २८ ड्रोन हल्ल्यांमुळे वीज व जलप्रकल्पांचे मोठे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर आखाती देश अजून अलर्ट मोडवर आहेत.

इराणला शस्त्रपुरवठा करणाऱ्यांवर ५०%  टॅरिफ

इराणला काही विशिष्ट निर्बंधांतून सवलत देऊ शकतो, असे ट्रम्प यांनी म्हटले. अमेरिकेने सादर केलेल्या १५ कलमी प्रस्तावातील अनेक मुद्द्यांवर यापूर्वीच एकमत झाले आहे. या संदर्भात इराणकडून अद्याप प्रतिसाद आलेला नाही, असेही ट्रम्प म्हणाले. इराणला शस्त्रपुरवठा करणाऱ्या देशांवर ५०%  टॅरिफ लादण्याचा इशाराही त्यांनी दिला. 

इराणमधील भारतीयांना मायदेशी परतण्याचा सल्ला

दुबई: इराणमधील भारतीयांनी तेहरानमधील भारतीय दूतावासाने सुचविलेल्या मार्गांचा वापर करून त्वरित बाहेर पडावे, असा सल्ला भारताने बुधवारी दिला आहे. दोन आठवड्यांच्या युद्धविरामाचे भारताने स्वागत केले.

इराणचा अमेरिकेला १० कलमी प्लॅन

१. अमेरिका आणि इस्रायलकडून हल्ले पूर्णपणे बंद व्हावेत
२. आर्थिक निर्बंध हटवले जावेत.
३. गोठवलेली मालमत्ता परत हवी. 
४. फक्त युद्धविराम नव्हे, तर संघर्ष पूर्णपणे संपवण्याची अट.
५. मध्यपूर्वेतील अमेरिकी लष्करी तळांवरून सैन्य हटवावे.
६. युद्धात झालेल्या नुकसानीसाठी आर्थिक भरपाई किंवा पुनर्बांधणीची व्यवस्था करावी.
७. होर्मुझ सामुद्रधुनीवर इराणचे नियंत्रण कायम ठेवण्याची अट.
८. जहाजांना मार्ग मोकळा राहील; मात्र तो इराणी लष्कराच्या देखरेखीखाली असेल.
९. प्रत्येक जहाजाकडून सुमारे २० लाख डॉलर्स शुल्क घेण्याचा प्रस्ताव, जो ओमानसोबत वाटला जाईल.
१०. लेबनॉनमध्ये हिजबुल्लावर होणारे हल्ले थांबवावेत.

युद्धविरामाचे परिणाम

बाजारातील गुंतवणूकदार १६.३ लाख कोटींनी श्रीमंत

अमेरिका आणि इराण यांच्यात  युद्धविरामाची घोषणा होताच शेअर बाजारात गुंतवणूकदारांची दिवाळी झाली. शेअर बाजाराने बुधवारी ऐतिहासिक उसळी घेतली. सेन्सेक्स २,९४६ अंकांनी तर निफ्टी ८७३ अंकांनी वधारला. गेल्या पाच वर्षांतील ही एका दिवसातील सर्वांत मोठी वाढ ठरली.

तेलाच्या दरात मोठी घसरण

युद्धविरामानंतर होर्मुझ सामुद्रधुनीतून तेल पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता निर्माण झाल्याने कच्च्या देलाच्या दरात मोठी घसरण झाली. ब्रेंट क्रूड तब्बल १२ टक्क्यांनी कोसळून ९६ डॉलर प्रति बॅरलपर्यंत खाली आले. डब्ल्यूटीआय क्रूड १५ टक्क्यांनी कोसळून ९६ डॉलर प्रति बॅरलवर आले.

सोने-चांदीच्या दरातही तेजी 

युद्धविरामाचे पडसाद बुधवारी सराफा बाजारात उमटले. दिल्लीत चांदीच्या दरात ११ हजार रुपयांची प्रचंड वाढ होऊन ती २.५१ लाख रुपये प्रतिकिलो या स्तरावर पोहोचली, तर सोन्याच्या दरातही ३,२०० रुपयांनी वाढ होत त्याने १.५६ लाख रुपयांचा टप्पा ओलांडला.

Web Title : युद्धविराम के बावजूद इस्राइल का लेबनान पर हमला; ईरान ने होर्मुज फिर बंद किया!

Web Summary : अमेरिका-ईरान युद्धविराम के बावजूद, इस्राइल ने लेबनान पर हमले जारी रखे। ईरान ने होर्मुज जलसंधि बंद करके जवाब दिया। ईरान ने अमेरिका से इस्राइल के युद्ध और शांति के बीच चयन करने को कहा। युद्धविराम के बाद बाजार में तेजी, तेल की कीमतों में गिरावट और सोने में उछाल आया।

Web Title : Truce, but Israel attacks Lebanon; Iran shuts Hormuz again!

Web Summary : Despite a US-Iran truce, Israel continues Lebanon attacks. Iran retaliates by closing the Strait of Hormuz. Iran demands America choose between Israel's war and peace. Market sees gains, oil prices fall, and gold rises post-truce.