‘थँक्सगिव्हिंग’पर्यंत हवाई वाहतूक ठप्प होण्याची भीती, अमेरिकेत २,१०० हून अधिक उड्डाणे रद्द, प्रवासी झाले त्रस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 06:59 IST2025-11-11T06:57:28+5:302025-11-11T06:59:20+5:30
United State News: शनिवार हजारभर उड्डाणे रद्द झाल्यानंतर रविवारीही अमेरिकेतील विमान कंपन्यांनी २,१०० हून अधिक उड्डाणे रद्द केली. याचा मोठा फटका आंतरदेशीय विमान वाहतुकीला आणि हजारो प्रवाशांना बसला.

‘थँक्सगिव्हिंग’पर्यंत हवाई वाहतूक ठप्प होण्याची भीती, अमेरिकेत २,१०० हून अधिक उड्डाणे रद्द, प्रवासी झाले त्रस्त
वॉशिंग्टन - शनिवार हजारभर उड्डाणे रद्द झाल्यानंतर रविवारीही अमेरिकेतील विमान कंपन्यांनी २,१०० हून अधिक उड्डाणे रद्द केली. याचा मोठा फटका आंतरदेशीय विमान वाहतुकीला आणि हजारो प्रवाशांना बसला. जर शटडाऊनचा कालावधी थँक्सगिव्हिंग सुट्टीपर्यंत कायम राहिला, तर देशभरातील हवाई वाहतूक विस्कळीत होऊन ती ठप्प होईल, असा इशारा अमेरिकेच्या वाहतूकमंत्र्यांनी दिला आहे.
अमेरिकेतील ४० प्रमुख विमानतळांवरून हवाई सेवा देशभरात सुरू असते. या विमानतळांवर शुक्रवारी, शनिवार व रविवारीही हवाई सेवा संपूर्णपणे कोलमडली दिसून आली. अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनने शटडाऊनमुळे विमान उड्डाणांमध्ये कपात करण्याचे आदेश दिले आहेत. ही कपात शुक्रवारी चार टक्के होती, ती १४ नोव्हेंबरपर्यंत १० टक्क्यांपर्यंत वाढेल. ही कपात सध्या सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत आहे. त्यात वाहतूक नियंत्रकांना पगार मिळाल्याने त्यांनी कामावर येणे बंद केले आहे.
हजारो उड्डाणे विलंबाने
अमेरिकेतील हवाई सेवेवर देखरेख ठेवणाऱ्या फ्लाइटअवेअर या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, केवळ रविवारी ७ हजार विमान उड्डाणांना विलंब झाला, तर २,१०० हून अधिक विमान उड्डाणे रद्द करण्यात आली. शुक्रवारी १,००० हून अधिक आणि शनिवारी १,५०० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली होती.
मवाळ डेमोक्रेट्समुळे शटडाऊन संपणार
वॉशिंग्टन : रविवारी डेमोक्रॅटिक पक्षाच्या काही मवाळ सदस्यांनी आरोग्यसेवेच्या अनुदानांना मुदतवाढ देण्याचा मुद्दा वगळून रिपब्लिकन पक्षाशी चर्चा करण्यास तयारी दाखवली आहे. ही हातमिळवणी माजी राष्ट्राध्यक्ष ओबामा यांच्या प्रयत्नातून झाली आहे.