अचानक बेपत्ता झाले वडील; 62 वर्षांनंतर मुलाला त्याच्यांच घरात सापडला मृतदेह, नेमकं काय झालं..?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 17:41 IST2025-12-15T17:41:02+5:302025-12-15T17:41:23+5:30
सिगारेट आणायला घराबाहेर पडले अन् परतलेच नाही..!

अचानक बेपत्ता झाले वडील; 62 वर्षांनंतर मुलाला त्याच्यांच घरात सापडला मृतदेह, नेमकं काय झालं..?
सिगरेट घेण्यासाठी घराबाहेर पडलेला एक अमेरिकन व्यक्ती अचानक बेपत्ता झाला. तो कुठे गेला, त्याचे काय झाले? याचा उलगडा अनेक दशकांपर्यंत होऊ शकला नाही. मात्र, तब्बल 62 वर्षांनंतर या रहस्यमय प्रकरणाचा धक्कादायक खुलासा झाला असून, त्या बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह त्याच्याच वडिलोपार्जित घरात सापडला आहे.
1963 मध्ये बेपत्ता
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जॉर्ज कॅरोल नावाचा व्यक्ती 1963 मध्ये अचानक बेपत्ता झाला होता. ते अमेरिकन लष्करातील माजी सैनिक होते. जॉर्ज बेपत्ता झाले, तेव्हा त्यांचा मुलगा मायकेल अवघा आठ महिन्यांचा होता. आता सहा दशकानंतर मायकेललाच आपल्या वडिलांचा मृतदेह सापडल्याने संपूर्ण कुटुंब हादरून गेले आहे.
कोरियात नवे आयुष्य सुरू केल्याची अफवा
मायकेलने सांगितले की, त्याची आई डोरोथी यांनी त्याला सांगितले होते की, जॉर्ज सिगरेट आणायला बाहेर गेले आणि परतलेच नाहीत. पुढे कुटुंबात अशी अफवा पसरली होती की, कोरियात लष्करी सेवेदरम्यान जॉर्ज एका महिलेला भेटले आणि तिथेच नवे कुटुंब व आयुष्य सुरू केले.
ज्योतिषाने दिलेल्या संकेतामुळे उलगडा
या प्रकरणाला वेगळे वळण तेव्हा मिळाले, जेव्हा मायकेलची बहीण जीन कॅनेडी 2010 मध्ये न्यूयॉर्कच्या लॉन्ग आयलंडमध्ये एका ज्योतिषाला भेटली. त्या ज्योतिषाने धक्कादायक दावा केला की, जॉर्ज यांची हत्या झाली असून त्यांना त्यांच्या कुटुंबाच्या घरातच गाडण्यात आले आहे. सहा दशकांनंतर झालेल्या उत्खननात मृतदेह नेमक्या त्याच ठिकाणी सापडल्याने सर्वच चक्रावून गेले.
वडिलोपार्जित घरात मृतदेह
मायकेलने 1993 मध्ये मायकेलने घराच्या अंगणात खोदकाम सुरू केले. या कामात त्याची दोन मुले क्रिस आणि माइक ज्युनियरदेखील सहभागी झाले. खोदकामात जमिनीखाली गाडलेला मृतदेह सापडला. मृतदेह सापडल्यानंतर मायकेलने तात्काळ पोलिसांना माहिती दिली. फॉरेन्सिक तपासात मृतदेहा जॉर्ज कॅरोल यांचा असल्याचे निष्पन्न झाले. तपासात हेही स्पष्ट झाले की, त्यांच्या कवटीला जड वस्तूने मार लागल्याने फ्रॅक्चर झाले होते आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
लोकांनी वेडे ठरवले
या घटनेवर आधारित “The Secrets We Bury” या डॉक्युमेंटरीच्या दिग्दर्शिका पेट्रीसिया ई. गिलेस्पी यांनी सांगितले की, अनेक वर्षे मायकेल आणि त्याची बहीण जीन यांना लोक वेडे ठरवत होते. तुमचे वडील तुम्हाला सोडून गेले, हे स्वीकारा, असे त्यांना सतत ऐकावे लागत होते. डॉक्युमेंटरीत मायकेलने दावा केला की, त्याच्या वडिलांच्या मृत्यूसाठी त्याचे सावत्र वडील रिचर्ड डारेस जबाबदार असावेत. जॉर्ज गायब झाल्यानंतर डोरोथी यांनी डारेसशी विवाह केला होता. मात्र, डारेस यांच्या विरोधात कधीही गुन्हेगारी चौकशी झाली नाही. 2018 मध्ये वयाच्या 77व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
पोलिसांत कधीच तक्रार दाखल नव्हती
धक्कादायक बाब म्हणजे, जॉर्ज कॅरोल बेपत्ता झाल्याची अधिकृत तक्रार त्या काळात पोलिसांत कधीच नोंदवली गेली नव्हती, असेही या डॉक्युमेंटरीत उघड झाले आहे. 62 वर्षांनंतर उलगडलेले हे प्रकरण केवळ एका कुटुंबापुरते मर्यादित नसून, अमेरिकेतील सर्वात रहस्यमय बेपत्ता प्रकरणांपैकी एक मानले जात आहे.