ब्राझीलमधील मिनास गॅराइस राज्यात ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये ३८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत १३ जण गंभीर जखमी आहेत. बसचा एक टायर फुटल्यामुळे बसचालकाचे नियंत्रण सुटले आणि बसने ट्रकला धडक दिली यामुळे हा अपघात झाला, अशी माहिती फायर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती अशी की, साओ पाउलोहून निघालेल्या बसमध्ये ४५ प्रवासी होते, मात्र वाटेत बसचा टायर फुटला आणि नंतर ट्रकला धडकली. यानंतर एक कारही आली आणि बसला धडकली, यामध्ये तीन प्रवासी होते, ते बचावले असल्याचे सांगण्यात येत आहे. पहाटे ४ वाजता हा अपघात झाला.
घटनास्थळावरील फोटोमध्ये चिरडलेल्या कारवर एक ट्रक असलेला दिसत असून, त्याचे चाक कारच्या छतावर असल्याचे दिसून येते. मिनास गेराइस अग्निशमन विभागाने सांगितले की, हा अपघात महामार्ग BR-116 वर झाला. अपघातानंतरच्या फोटोमध्ये वाहनाचा ढिगारा दिसत आहे. बसला आग लागल्याचे दिसत आले असून, त्यात बस जळताना दिसत आहे.
पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. घटनास्थळावरून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिनास गेराइसचे गव्हर्नर रोम्यू झेमा यांनी ट्विटरवर सांगितले की, त्यांनी टिओफिलो ओटोनी येथील BR-116 वर झालेल्या दुःखद अपघातात "पीडितांना मदत करण्याचे आणि त्यांच्या कुटुंबीयांना आधार देण्याचे" आदेश दिले आहेत.
२०२१ मध्ये ब्राझीलमधील रस्त्यावरील अपघातातील मृत्यू दर प्रति १००,००० लोकांमागे १५.७ होता, जो अर्जेंटिनामधील ८.८ पेक्षा खूपच जास्त होता. रस्ता सुरक्षेबाबत, ब्राझीलने २०३० पर्यंत मृत्यूची संख्या निम्म्या करण्याचे लक्ष्य ठेवले आहे, यामुळे ८६,००० जीव वाचतील अशी अपेक्षा आहे.