पाकिस्तानी इतिहासात पहिल्यांदाच ISI प्रमुखाला शिक्षा! इम्रान खानशी संबंध भोवले, जनरल फैज हमीद १४ वर्षे तुरुंगवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 14:50 IST2025-12-11T14:49:53+5:302025-12-11T14:50:37+5:30
Faiz Hameed Court Martial: पाकिस्तानच्या राजकीय आणि लष्करी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आयएसआयच्या प्रमुखाला एवढ्या मोठ्या स्तरावर शिक्षा होण्याची ही पाकिस्तानी इतिहासातील पहिलीच घटना आहे.

पाकिस्तानी इतिहासात पहिल्यांदाच ISI प्रमुखाला शिक्षा! इम्रान खानशी संबंध भोवले, जनरल फैज हमीद १४ वर्षे तुरुंगवास
भारताविरोधात कटकारस्थाने रचणारी पाकिस्तानची गुप्तचर संस्था इंटर-सर्विसेज इंटेलिजेंसचे माजी महासंचालक लेफ्टनंट जनरल (निवृत्त) फैज हमीद यांना लष्करी कोर्ट मार्शलने १४ वर्षांची कठोर शिक्षा सुनावली आहे. यामुळे पाकिस्तानच्या राजकीय आणि लष्करी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आयएसआयच्या प्रमुखाला एवढ्या मोठ्या स्तरावर शिक्षा होण्याची ही पाकिस्तानी इतिहासातील पहिलीच घटना आहे.
लेफ्टनंट जनरल (निवृत्त) फैज हमीद यांना 'ऑफिशियल सीक्रेट अॅक्ट'चे उल्लंघन केल्याप्रकरणी आणि इतर गंभीर आरोपांखाली दोषी ठरवण्यात आले आहे. पाकिस्तानी लष्कराची मीडिया विंगने दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट २०२४ मध्ये 'फील्ड जनरल कोर्ट मार्शल'द्वारे फैज हमीद यांच्याविरुद्ध कार्यवाही सुरू करण्यात आली होती. १५ महिने चाललेल्या या प्रक्रियेनंतर त्यांना दोषी ठरवण्यात आले आणि ११ डिसेंबरपासून ही शिक्षा लागू करण्यात आली आहे.
आरोप काय
फैज हमीद यांच्यावर मुख्यत्वे राजकीय गतिविधींमध्ये सहभाग, गुपित कायद्याचे उल्लंघन, अधिकारांचा गैरवापर, सरकारी संसाधनांचा दुरुपयोग आणि संबंधित व्यक्तींना बेकायदेशीरपणे नुकसान पोहोचवणे, यांसारखे गंभीर आरोप सिद्ध झाले आहेत.
फैज हमीद हे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जात होते. विद्यमान लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्या विरोधी गटातील ते असल्याने, त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता होती. हमीद हे २०२०-२१ मध्ये ISI प्रमुख असताना, अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केल्यावर ते अचानक काबुलमध्ये एका हॉटेलमध्ये 'चहा' पिताना दिसले होते, ज्यामुळे ते जगभरात चर्चेचा विषय बनले होते. ISI प्रमुखपदाव्यतिरिक्त त्यांनी पेशावरचे कॉर्प्स कमांडर पदही सांभाळले होते.
सध्या पाकिस्तानी लष्कर फैज हमीद यांची राजकीय घटकांशी असलेली कथित संगनमत आणि अस्थिरतेशी संबंधित प्रकरणांची वेगळी चौकशी करत आहे. या प्रकरणातही त्यांना शिक्षा होण्याची शक्यता आहे. मात्र, लष्कराने फैज हमीद यांना अपील करण्याचा अधिकार असल्याचे स्पष्ट केले आहे.