BRICS चा विस्तार, सौदी, UAEसह या सहा देशांचाही समावेश, मोदींच्या उपस्थितीत घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2023 14:32 IST2023-08-24T14:26:32+5:302023-08-24T14:32:52+5:30
BRICS : दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या ब्रिक्स संमेलनामध्ये मोठी घोषणा करण्यात आली आहे. भारतासह पाच देशांचा समावेश असलेल्या ब्रिक्सचा आता विस्तार झाला असून, त्यामध्ये आणखी सहा देशांचा समावेश करण्यात आला आहे.

BRICS चा विस्तार, सौदी, UAEसह या सहा देशांचाही समावेश, मोदींच्या उपस्थितीत घोषणा
दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या ब्रिक्स संमेलनामध्ये मोठी घोषणा करण्यात आली आहे. ब्रिक्सचा आता विस्तार झाला असून, त्यामध्ये आणखी सहा देशांचा समावेश करण्यात आला आहे. ब्रिक्समध्ये इराण, अर्जेंटिना, इथिओपिया, इजिप्त, इराण, संयुक्त अरब अमिराती आणि सौदी अरेबियाचा समावेश करण्यात आला असून, या संघटनेचं नामकरण ब्रिक्स प्लस असं करण्यात आलं आहे. दक्षिण आफ्रिकेमधील जोहान्सबर्ग येथे सुरू असलेल्या ब्रिक्स परिषदेमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर बड्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती रामफोसा यांनी ही घोषणा केली आहे.
याआधी ब्रिक्समध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या पाच देशांचा समावेश होता. त्या देशांच्या अद्याक्षरांवरूनच संघटनेला ब्रिक्स असं नाव देण्यात आलं होतं. मात्र आता यामध्ये आणखी सहा देशांचा समावेश झाल्याने ब्रिक्स संघटनेतील सदस्य देशांची संख्या ११ झाली आहे.
रामफोसा यांनी सांगितले की, ब्रिक्सच्या विस्ताराच्या पहिल्या टप्प्याला आमची सहमती आहे. तसेच इतर टप्पे यानंतर पार पडतील. सध्या आम्ही अर्जेंटिना, इजिप्त, इथिओपिया, इराण, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीला ब्रिक्सचे पूर्ण सदस्य बनण्यासाठी निमंत्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. हे देश १ जानेवारीपासून संघटनेचे सदस्य बनतील.