Sheikh Hasina: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मृत्युदंड!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 07:49 IST2025-11-18T07:48:07+5:302025-11-18T07:49:29+5:30
Sheikh Hasina News: माजी पंतप्रधान शेख हसीना यांना सोमवारी बांगलादेश आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे.

Sheikh Hasina: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मृत्युदंड!
ढाका : गेल्या वर्षी जुलै महिन्यात सरकारविरोधात झालेल्या निदर्शनांत आंदोलकांवर केलेली कठोर कारवाई हा मानवते विरोधातील गुन्हा आहे, असा ठपका ठेवत बांगलादेशच्या परागंदा माजी पंतप्रधान शेख हसीना (७८) यांना सोमवारी बांगलादेशआंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे.
न्या. मोहम्मद गुलाम मुर्तजा मजुमदार यांच्या अध्यक्षतेखाली न्यायपीठाने ही शिक्षा सुनावली. हसीना यांच्याबरोबर माजी गृहमंत्री असदुज्जमां खान कमाल यांना फाशीची तर माजी पोलिस महानिरीक्षक अब्दुल्ला अल मनून हे सरकारी साक्षीदार ठरल्याने त्यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. शेख हसीना व कमाल यांनी भारतात आश्रय घेतला आहे. या खटल्याच्या निकालपत्राचे थेट प्रक्षेपण बांगलादेश टीव्हीवरून दाखवण्यात आले होते. निकाल वाचल्यावर काही लोकांनी न्यायालयात जल्लोष केला पण न्यायाधीशांनी त्वरित मनाई केली.
आपल्याविरोधात दिलेला निकाल हा पक्षपाती असून ज्या न्यायाधिकरणाने हा निकाल दिला तेच बेकायदा आहे. या न्यायालयाची स्थापना कोणताही जनाधार नसलेल्या सरकारकडून झाली आहे, असा आरोप हसीना यांनी केला. कट्टरतावाद्यांना मला फाशीची शिक्षा द्यायची आहे. हे लोक निर्लज्ज आहेत, त्यांना लोकांनी निवडून दिलेला पंतप्रधान हटवायचा आहे. अवामी लीग पक्षाची राजकीय ताकद संपवण्याचा यांचा हेतू असल्याचेही हसीना म्हणाल्या. हिंमत असेल तर हेगस्थित आंतरराष्ट्रीय न्यायालयात माझ्याविरोधात खटला लढवून दाखवावा असे आव्हान त्यांनी बांगलादेश सरकारला दिले.