बांगलादेशात खळबळ! १७ वर्षांनंतर तारिक रहमान मायदेशी परतले; येताच मोहम्मद युनूस यांना केला फोन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 08:51 IST2025-12-26T08:51:00+5:302025-12-26T08:51:22+5:30
बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष तारिक रहमान तब्बल १७ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर मायदेशी परतले आहेत.

बांगलादेशात खळबळ! १७ वर्षांनंतर तारिक रहमान मायदेशी परतले; येताच मोहम्मद युनूस यांना केला फोन!
शेख हसीना यांच्या सत्तांतरामुळे राजकीय अस्थिरतेच्या गर्तेत सापडलेल्या बांगलादेशात आता एका मोठ्या नावाचे पुनरागमन झाले आहे. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष तारिक रहमान तब्बल १७ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर मायदेशी परतले आहेत. गुरुवारी त्यांचे ढाका येथे आगमन झाले असता समर्थकांनी त्यांचे जंगी स्वागत केले. मायदेशी परतताच रहमान यांनी सर्वात आधी देशाचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांना फोन करून संवाद साधल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
मुख्य सल्लागारांशी काय झाली चर्चा?
तारिक रहमान यांनी गुरुवारी मोहम्मद युनूस यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी रहमान यांनी सरकारतर्फे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला देण्यात आलेल्या कडेकोट सुरक्षेबद्दल आभार मानले. ही चर्चा अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली असून, दोन्ही नेत्यांमध्ये देशातील सध्याची राजकीय स्थिती आणि आगामी घडामोडींबाबतही प्राथमिक चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. १७ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर झालेल्या या संवादाला बांगलादेशच्या नव्या राजकारणाची नांदी मानले जात आहे.
पित्याच्या कबरीचे घेणार दर्शन
शुक्रवारी तारिक रहमान आपल्या पुढील दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. जुम्माच्या नमाजानंतर ते त्यांचे वडील आणि बांगलादेशचे माजी लष्करी शासक जनरल झियाउर रहमान यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन दर्शन घेतील. यानंतर ते सावर येथील राष्ट्रीय शहीद स्मारकाकडे रवाना होतील. १९७१ च्या मुक्ती संग्रामात बलिदान देणाऱ्या शहिदांना ते तिथे पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहणार आहेत.
भावी पंतप्रधान म्हणून चर्चा जोरात
बांगलादेशातील सध्याच्या बदलत्या वातावरणात तारिक रहमान यांच्याकडे 'भावी पंतप्रधान' म्हणून पाहिले जात आहे. अवामी लीगवर आलेल्या निर्बंधांमुळे आणि जमात-ए-इस्लामीच्या तुलनेत बीएनपी हा सध्या देशातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून समोर येत आहे. अशा स्थितीत रहमान यांचे पुनरागमन अवामी लीगच्या उरल्यासुरल्या अस्तित्वासाठी मोठे आव्हान मानले जात आहे.
समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण
१७ वर्षे देशाबाहेर राहिलेल्या आपल्या लाडक्या नेत्याला पाहण्यासाठी ढाका विमानतळाबाहेर समर्थकांची अभूतपूर्व गर्दी झाली होती. आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तारिक रहमान यांचे आगमन बांगलादेशच्या राजकारणाला कोणती नवी दिशा देते, याकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.