पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 19:51 IST2025-06-21T19:46:50+5:302025-06-21T19:51:11+5:30
एकीकडे पाकिस्तानी लष्करप्रमुखांना ट्रम्प यांनी जेवायला बोलविल्याची शेखी पाकिस्तान मिरवत असताना दुसरीकडे इस्लामाबादचा मारेकरी असा विरोधही हेच पाकिस्तानी वॉशिंग्टनमध्ये करत होते.

पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
पाकिस्तानचे लष्करप्रमुख आणि फील्ड मार्शल अमेरिकेला डोनाल्ड ट्रम्प यांना भेटायला गेले होते खरे परंतू पाकिस्तानची पार नाचक्की करून आले आहेत. मुनीर यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना कुत्र्याची उपमा दिली आहे. यामुळे पाकिस्तानींना शरमेने मान खाली घालण्याची वेळ आली आहे.
मुनीर यांच्यासोबत अन्य तीन जण या दौऱ्यात होते. यामध्ये आयएसआय प्रमुख असीम मलिक, पाकिस्तानी राजदूत आणि पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नकवी हे होते. परंतू, व्हाईट हाऊसमध्ये केवळ आयएसआय प्रमुख आणि लष्कर प्रमुखांनाच प्रवेश देण्यात आला. तर पाकिस्तानी राजदूत आणि गृहमंत्र्यांना बाहेरच दरवाजावर उभे करून ठेवण्यात आले होते.
एकीकडे पाकिस्तानी लष्करप्रमुखांना ट्रम्प यांनी जेवायला बोलविल्याची शेखी पाकिस्तान मिरवत असताना दुसरीकडे इस्लामाबादचा मारेकरी असा विरोधही हेच पाकिस्तानी वॉशिंग्टनमध्ये करत होते. याहून पुढे जात मुनीर यांच्यासाठी पाकिस्तानने आपल्या नागरिकांची एक सभा भरविली होती. या सभेत या मुनीर यांनी पाकिस्तानी पंतप्रधानांची तुलना कुत्र्याशी केली. जर कुत्राजरी पाकिस्तानचा पंतप्रधान बनला आणि चांगले काम केले तर त्याचे आपण स्वागत केले पाहिजे, असे तारे मुनीर यांनी तोडले आहेत.
एकंदरीतच पाकिस्तानी पंतप्रधान कसे पाकिस्तानी लष्कराचे कुत्रे आहेत, हेच मुनीर यांनी आता जगासमोर आणले आहेत. आता हाच पाकिस्तान देशादेशांत भांडणे लावून जगाचा उद्धार करायला निघालेल्या डोनाल्ड ट्रम्पना शांततेचा नोबेल पुरस्कार कसा मिळेल, याची तयारी करू लागला आहे. काय तर म्हणे ट्रम्पनी भारत-पाकिस्तान युद्ध थांबविले म्हणून त्यांना नोबेल पुरस्कार द्या, यानंतर लगेचच ट्रम्पनाही नोबेल पुरस्काराची स्वप्ने पडू लागली आहेत.