बिपरजॉय पाकिस्तानात जाण्यापूर्वीच हाहाकार! पावसामुळे २८ लोकांचा मृत्यू, १४५ जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2023 10:10 IST2023-06-11T10:10:12+5:302023-06-11T10:10:37+5:30
अरबी समुद्रातून येणाऱ्या 'बिपरजॉय' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान शरीफ यांनी अधिकाऱ्यांना आपत्कालीन उपाययोजना करण्याचे आदेश जारी केले आहेत.

बिपरजॉय पाकिस्तानात जाण्यापूर्वीच हाहाकार! पावसामुळे २८ लोकांचा मृत्यू, १४५ जखमी
भारतातील किनारपट्टी भागातील राज्यांना बिपरजॉय चक्रीवादळाचा अलर्ट जारी करण्यात आलेला असताना तिकडे सीमेपलिकडे पावसाने हाहाकार उडवून दिला आहे. पाकिस्तानच्या पश्चिमोत्तर भागात शनिवारी झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे जवळपास २८ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर १४५ जखमी झाले आहेत. पावसामुळे घरे कोसळून दुर्घटना घडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
वरिष्ठ बचाव अधिकारी खतीर अहमद यांनी सांगितले की, खैबर पख्तुनख्वा प्रांतातील बन्नू, लक्की मारवत आणि करक जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि गारपिटीमुळे अनेक झाडे उन्मळून पडली आणि विजेचे खांब कोसळले आहेत.
अरबी समुद्रातून येणाऱ्या 'बिपरजॉय' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान शरीफ यांनी अधिकाऱ्यांना आपत्कालीन उपाययोजना करण्याचे आदेश जारी केले आहेत. शरीफ यांनी शनिवारी वादळात झालेल्या जीवितहानीबद्दल दु:ख व्यक्त केले आणि अधिकाऱ्यांना मदत कार्याला गती देण्याचे निर्देश दिले.
अरबी समुद्रात तयार झालेले चक्रीवादळ 'बिपरजॉय' पाकिस्तानात येण्याची शक्यता नाहीय. परंतू, सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सिंध आणि बलुचिस्तानमधील किनारी भागातील अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचा सल्ला पाकिस्तान हवामान विभागाने दिला आहे. गंभीर आणि तीव्र स्वरुपाचे चक्रीवादळ 150 किमी प्रतितास (ताशी 93 मैल) वेगाने वाऱ्यासह देशाच्या दक्षिणेकडे सरकत आहे, असे म्हटले आहे.