एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 11:32 IST2025-12-17T11:29:46+5:302025-12-17T11:32:37+5:30
Jeffrey Epstein Files Release 2025: जेफ्री एपस्टीन हा एक अमेरिकन फायनान्सर होता, ज्याच्यावर अल्पवयीन मुलींची तस्करी आणि लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप होते. २०१९ मध्ये तुरुंगात असतानाच त्याचा गूढ मृत्यू झाला.

एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
जगप्रसिद्ध जेफ्री एपस्टीन सेक्स स्कँडल प्रकरणातील सर्व गोपनीय रेकॉर्ड्स सार्वजनिक होण्यासाठी आता केवळ २ दिवसांचा अवधी शिल्लक आहे. अमेरिकेच्या जस्टिस डिपार्टमेंटने हे रेकॉर्ड्स खुले करण्याची तयारी पूर्ण केली असून, यामुळे केवळ अमेरिकाच नाही तर जगभरातील राजकीय आणि व्यापारी वर्तुळात दहशतीचे वातावरण आहे.
अमेरिकेतील सर्वात मोठे आणि वादग्रस्त 'जेफ्री एपस्टीन सेक्स स्कँडल' पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. अमेरिकन हाऊस ओव्हरसाईट कमिटीने एपस्टीनशी संबंधित २३,००० पानांच्या नवीन फाईल्स आणि फोटो सार्वजनिक केल्यामुळे खळबळ उडाली आहे. या नव्या खुलाशांमध्ये अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आणि बिल गेट्स यांसारख्या प्रभावशाली व्यक्तींचे नाव समोर आले आहे.
प्रसिद्ध होत असलेल्या कागदपत्रांमध्ये एपस्टीनचे इमेल्स, त्याच्या खाजगी विमानाचे फ्लाईट लॉग्स आणि काही न पाहिलेले फोटो समाविष्ट आहेत. इमेल्समध्ये ट्रम्प यांचा उल्लेख असून त्यांच्याशी एपस्टीनच्या असलेल्या संबंधांवरून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तथापि, ट्रम्प यांनी यापूर्वीच सर्व आरोप फेटाळले असून आपण एपस्टीनला क्लबमधून हाकलून दिले होते, असा दावा केला आहे.
भारत कनेक्शन...
ब्रिटनचे माजी प्रिन्स अँड्र्यू, लॅरी समर्स आणि स्टीव्ह बॅनन यांचीही नावे या यादीत आहेत. या फाईल्समध्ये भारताचे केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांना २०१४ मध्ये एपस्टीनने एका कार्यक्रमाचे निमंत्रण दिल्याचे संदर्भ आढळले आहेत. मात्र, भाजपने हे केवळ 'नाव वापरण्याचे' तंत्र असून यात कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले आहे.
सुब्रमण्यम स्वामींच्या दाव्याने खळबळ
आत्तापर्यंत या प्रकरणात अधिकृतपणे कोणत्याही भारतीय व्यक्तीचे नाव समोर आलेले नाही. मात्र, भारतीय राजकारणातील ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी एक मोठा दावा केला आहे. स्वामींच्या मते, आगामी दोन दिवसांत सार्वजनिक होणाऱ्या फाईल्समध्ये काही भारतीय मंत्री, माजी मंत्री आणि विद्यमान खासदारांची नावे असू शकतात. या दाव्यामुळे भारतीय राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आले आहे.
जेफ्री एपस्टीन कोण होता?
जेफ्री एपस्टीन हा एक अमेरिकन फायनान्सर होता, ज्याच्यावर अल्पवयीन मुलींची तस्करी आणि लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप होते. २०१९ मध्ये तुरुंगात असतानाच त्याचा गूढ मृत्यू झाला. तेव्हापासून त्याच्या 'क्लायंट लिस्ट'बद्दल जगभरात उत्सुकता आणि भीती आहे.