Donlad Trump India Pakistan Ceasefire: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष सोडवण्यास मदत केल्याचं म्हटलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी असा दावाही केला की मी जगभरातील इतर अनेक युद्धे देखील थांबवली आहेत. ट्रम्प यांनी माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे देतना पाच युद्धे संपवल्याचे म्हटलं ज्यात कांगो आणि रवांडा यांच्यातील ३१ वर्षे जुने युद्ध समाविष्ट आहे. यावेळी ट्रम्प यांनी भारत पाकिस्तान युद्धाचाही उल्लेख केला. पंतप्रधान मोदी यांनी संसदेत बोलताना जगातील कोणत्याही नेत्याने भारताला ऑपरेशन सिंदूर थांबवण्यास सांगितले नाही, असं म्हटलं होतं. मात्र त्यानंतरही ट्रम्प यांनी भारत पाक युद्धा मध्यस्थी केल्याचा दावा केला.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय घेतले आहे. ट्रम्प यांनी माध्यमांशी बोलताना भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष संपवल्याचा दावा केला. ट्रम्प येथेच थांबले नाहीत आणि म्हणाले की त्यांनी पाच महिन्यांत पाच युद्धे संपवली आहेत, ज्यामध्ये काँगो-रवांडा सारख्या संघर्षांचाही समावेश आहे.
"हे बायडेन यांचे युद्ध आहे आणि आम्ही त्यातून बाहेर पडण्यासाठी कठोर मेहनत घेत आहोत. मी गेल्या पाच महिन्यांत पाच युद्धे थांबवली आहेत आणि खरे सांगायचे झालं तर, हे सहावं युद्ध असावं अशी माझी इच्छा आहे. बाकीची युद्धे मी काही दिवसांत थांबवली, जवळजवळ सर्वच, ज्यात भारत आणि पाकिस्तानचा समावेश आहे. मी संपूर्ण यादीबद्दल पुढे सांगू शकतो, पण तुम्हाला ही यादी माझ्याइतकीच चांगली माहिती आहे," असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं.
डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की त्यांनी भारत-पाकिस्तान संघर्षासह अनेक युद्धे थांबवली आहेत. त्यांनी थायलंड आणि कंबोडिया, काँगो आणि रवांडा यांच्यातील संघर्षांचाही उल्लेख केला. जर तुम्ही लोक लढलात तर आम्ही तुमच्याशी कोणताही व्यापार करार करणार नाही. यानंतर त्यांनी युद्ध थांबवले, असं ट्रम्प यांनी या देशांना सांगितल्याचे म्हटलं.
दरम्यान, १० मे पासून ट्रम्प यांनी अनेक वेळा दावा केला आहे की अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर भारत आणि पाकिस्तानने युद्धबंदीवर सहमती दर्शविली. मात्र भारताने युद्धबंदीत अमेरिकेचा कोणताही सहभाग स्पष्टपणे नाकारला आहे. पंतप्रधान मोदींनी संसदेत सांगितले की कोणत्याही परदेशी नेत्याने भारताला ऑपरेशन सिंदूर थांबवण्याचा आग्रह केला नाही.