इम्रान, कादरींचा दबाव आणखी वाढला
By Admin | Updated: September 15, 2014 03:35 IST2014-09-15T03:35:53+5:302014-09-15T03:35:53+5:30
अटक करण्यात आलेले इम्रान खान आणि ताहीर ऊल कादरी यांच्या सर्व समर्थकांची सुटका करण्याचे आदेश इस्लामाबाद उच्च न्यायालयाने दिले.

इम्रान, कादरींचा दबाव आणखी वाढला
इस्लामाबाद : अटक करण्यात आलेले इम्रान खान आणि ताहीर ऊल कादरी यांच्या सर्व समर्थकांची सुटका करण्याचे आदेश इस्लामाबाद उच्च न्यायालयाने दिल्याने शरीफ सरकारविरुद्ध आंदोलन करणाऱ्या विरोधकांचे नैतिक बळ वाढले आहे.
दुसरीकडे पंतप्रधान शरीफ राजीनामा देत नाहीत, तोवर संसदेसमोर निदर्शने चालू ठेवण्याचा निर्धार करीत पाकिस्तान तेहरिक-ए- इन्साफ आणि पाकिस्तान अवामी तेहरिक या विरोधी पक्षांनी शरीफ सरकारवरील दबाव वाढविला आहे.
बेकायदेशीर निदर्शने आणि इतर कायद्यांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानी पोलिसांनी विरोधी कार्यकर्त्यांना अटक केली होती, तर काल शनिवारी कोर्टाने विरोधकांच्या १०० कार्यकर्त्यांना १४ दिवसांची रिमांड देत त्यांची तुरुंगात रवानगी केली होती. यात इम्रान खानच्या पार्टीचे ९१, तर उर्वरित कादरी यांच्या पार्टीचे कार्यकर्ते आहेत.
इस्लामाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मोहम्मद अन्वर खान कासी यांनी कनिष्ठ न्यायालयाचा आदेश रद्दबातल ठरवीत सर्व कार्यकर्त्यांची सुटका करण्याचे आदेश दिले. तसेच सरकारला १७ सप्टेंबरपर्यंत या अटकेसंदर्भात उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.(वृत्तसंस्था)