ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 12:56 IST2025-06-21T12:55:08+5:302025-06-21T12:56:20+5:30
अबू धाबी न्यायालयाने एका कंपनीला त्यांच्या कर्मचाऱ्याचा ५ महिन्यांचा पगार देण्याचे आदेश दिले आहेत. तो कर्मचारी एक दिवसही कामावर गेला नव्हता.

ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
एका कर्मचाऱ्याला काम न करताच एका कंपनीने २६ लाख रुपये दिले. तर तुम्हाला ते पटेल का? पण, हे खरं आहे. अबू धाबी मधील कोर्टाने एक अजब निर्णय दिला. कोर्टाने एका कंपनीला आपल्या कर्मचाऱ्याला पाच महिन्यांचा पगार देण्याचे आदेश दिले. तो कर्मचारी एक दिवसही कामावर गेला नव्हता तरीही कोर्टाने हा निर्णय दिलाय. कोर्टाच्या आदेशानुसार आता कंपनीला २६ लाख रुपये पगार कर्मचाऱ्याला द्यावा लागणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीने त्या कर्मचाऱ्याला ऑफर लेटर दिले पण कधीही जॉईनिंगसाठी बोलावले नाही, असा आरोप कर्मचाऱ्याने केला आहे. कंपनीने कर्मचाऱ्यासोबत ५ महिन्यांचा करार केला होता. अशा परिस्थितीत आता कर्मचाऱ्याला ५ महिन्यांचा पगार दिला जाईल.
५ महिन्यांचा पगार द्यावा लागणार
कंपनीने जॉईन करुन घेतल्याबद्दल कर्मचाऱ्याने न्यायालयात याचिका दाखल केली होती. 'कंपनीने त्याच्यासोबत ११ नोव्हेंबर २०२४ ते ७ एप्रिल २०२५ दरम्यान कामाचा करार केला होता, परंतु त्याला जॉईन करुन घेतले नाही', असा दावा कर्मचाऱ्याने केला.
कर्मचाऱ्याने कंपनीसोबत केलेल्या करारानुसार, कंपनीला ७,२०० दिरहम मूळ वेतन द्यावे लागेल. तसेच मासिक पेमेंट पॅकेज २४,००० दिरहम असेल. हे लक्षात घेऊन, न्यायालयाने कंपनीला कर्मचाऱ्याला २६ लाख रुपये देण्याचे आदेश दिले आहेत.
न्यायालयाने निर्णयात म्हटले आहे की, पगार अहवाल, उत्पन्न करारासह सर्व कागदपत्रांवरून हे स्पष्ट होते की कंपनीकडून कर्मचाऱ्याच्या नियुक्तीत विलंब झाला आहे.
कंपनीने बाजू मांडली
कंपनीने कोर्टात आपली बाजू मांडली. या कंपनीकडून सांगितले की, कर्मचाऱ्याने सुरुवातीलाच रजा घेतली होती. त्यामुळे त्याला कामावर बोलावण्यात आले नव्हते. कर्मचाऱ्याने ८ दिवसांची रजा घेतल्याचेही मान्य केले आहे. अशा परिस्थितीत, ८ दिवसांचा पगार कापून न्यायालयाने कंपनीला कर्मचाऱ्याला ४ महिने १८ दिवसांचा पगार देण्याचे आदेश दिले आहेत. ही रक्कम २६ लाख रुपये होते.