ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 08:12 IST2025-07-22T08:11:05+5:302025-07-22T08:12:03+5:30

इमॅन्युएल यांच्यापेक्षा त्यांची पत्नी ब्रिगिट २४ वर्षांनी मोठ्या आहेत. इमॅन्युएल १५ वर्षांचे होते, तेव्हा त्यांची आणि ब्रिगिट यांची पहिल्यांदा ओळख झाली.

Emmanuel Macron's Wife Accused of Being Transgender Man; Lawsuit Shocks Global Media | ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?

ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?

फ्रान्सचेराष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन विमानातून उतरण्याच्या तयारीत असतानाच विमानाचा दरवाजा उघडतो. एवढ्यात त्यांची पत्नी ब्रिगिट या इमॅन्युएल यांचं तोंड पकडून त्यांना ढकलताना दिसतात. इमॅन्युएल मॅक्रॉन व्हिएतनाम दौऱ्यावर असातानाचा हा व्हिडीओ जगभर गाजला आणि त्यावरून अनेक वाद, शंका-कुशंकांनाही ऊत आला. 

आता एका वेगळ्याच प्रकारानं हे दोघं जगभर चर्चेत आले आहेत. आरोप तसा अतिशय गंभीर आहे आणि त्याची एक मोठी कहाणीही आहे. इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या पत्नी ब्रिगिट यांनी दोन महिला युट्यूबर्सविरुद्धची आपली केस थेट फ्रान्सच्या सुप्रीम कोर्टापर्यंत नेली आहे. या दोन्ही महिलांचा खळबळजनक दावा आहे, ब्रिग्रिट या महिला नसून पुरुष आहेत आणि त्यांचं खरं नाव जीन-मिशेल ट्रोग्नेक्स आहे. या कहाणीला सुरुवात झाली २०२१मध्ये. त्यावेळी अमंडाइन रॉय नावाच्या एका युट्यूबर महिलेनं नताशा रे या पत्रकाराची मुलाखत घेतली. या मुलाखतीत नताशा यांनी दावा केला की, ब्रिगिट या मुळात महिला नसून, पुरुष आहेत. याबाबत गेली तीन वर्षे मी ‘तपास, संशोधन’ करते आहे आणि जीन मिशेल यांनी लिंग परिवर्तन केल्यानंतर इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी लग्न केलं. हा व्हिडीओ जगभरात व्हायरल झाला आणि त्यांच्याविषयी वेगवेगळ्या कंड्या उठू लागल्या. 
मात्र जीन मिशेल हे ब्रिगिट यांच्या भावाचं नाव आहे आणि दोघांच्या चेहऱ्यात प्रचंड साम्य आहे. 

या आरोपानंतर ब्रिगिट यांनी पॅरिसच्या न्यायालयात खटला दाखल केला. सप्टेंबर २०२३मध्ये न्यायालयानं त्या दोन्ही महिलांना दोषी ठरवत ब्रिगिट यांना सात लाख रुपये आणि त्यांचे बंधू जीन यांना पाच लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला. मात्र पॅरिसच्या न्यायालयानं काही दिवसांपूर्वीच निकाल फिरवला. त्यामुळे ब्रिगिट आणि त्यांचे बंधू जीन मिशेल यांनी या निर्णयाविरुद्ध सुप्रीम कोर्टात अपिल दाखल केलं आहे. अमेरिकेतील दोन पत्रकार कॅन्डेस ओवेन्स आणि टकर कार्लसन यांनीही असाच दावा केला आहे. इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी त्यांनाही कायदेशीर नोटीस पाठवली आहे. 

पण याआधीचीही आणखी एक कहाणी आहेच. इमॅन्युएल यांच्यापेक्षा त्यांची पत्नी ब्रिगिट २४ वर्षांनी मोठ्या आहेत. इमॅन्युएल १५ वर्षांचे होते, तेव्हा त्यांची आणि ब्रिगिट यांची पहिल्यांदा ओळख झाली. इमॅन्युएल ज्या शाळेत शिकत होते, त्याच शाळेत ब्रिगिट शिक्षिका होत्या. ब्रिगिट यांना तीन अपत्यं. त्यांची एक मुलगी इमॅन्युएल यांच्याच वर्गात होती. अनेकांना वाटायचं, हे दोघं प्रेमात आहेत, पण इमॅन्युएल खरंतर आपल्या या मैत्रिणीच्या आईच्या प्रेमात होते! इमॅन्युएल यांच्या पालकांना हा प्रकार कळल्यावर त्यांनी इमॅन्युएल यांना या शाळेतून काढून थेट पॅरिसला पाठवून दिलं. त्यांनी ब्रिगिट यांनाही ‘धमकी’ दिली, जोपर्यंत आमचा मुलगा सज्ञान होत नाही, तोपर्यंत त्याच्यापासून दूर राहा!

इमॅन्युएल आणि ब्रिगिट यांची भेट झाल्यानंतर १४ वर्षांनी, २००६मध्ये  ब्रिगिट यांनी आपल्या पतीला घटस्फोट दिला. त्यानंतर २००७मध्ये इमॅन्युएल आणि ब्रिगिट यांनी लग्न केलं. त्यावेळी इमॅन्युएल २९ वर्षांचे, तर ब्रिगिट ५४ वर्षांच्या होत्या! इमॅन्युएल यांना जैविक मुलं नाहीत. त्यांनी ब्रिगिट यांच्या मुलांनाच आपली मुलं मानलं. त्यांना नातूही आहेत!

Web Title: Emmanuel Macron's Wife Accused of Being Transgender Man; Lawsuit Shocks Global Media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.