Emergency in Pakistan: पाकिस्तानातील परिस्थिती बिघडली, शहबाज कॅबिनेटची आणीबाणीची शिफारस
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2023 15:45 IST2023-05-12T15:44:44+5:302023-05-12T15:45:14+5:30
पाकिस्तानात सध्या परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ लागली आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या मंत्रिमंडळानं आणीबाणी लागू करण्याची शिफारस केलीये.

Emergency in Pakistan: पाकिस्तानातील परिस्थिती बिघडली, शहबाज कॅबिनेटची आणीबाणीची शिफारस
पाकिस्तानातील सध्याची परिस्थिती पाहता आणीबाणी लागू केली जाऊ शकते. पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेतली. या बैठकीत देशात आणीबाणी लागू करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज यांनी फेडरल कॅबिनेटला संबोधित केलं. पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे अध्यक्ष इम्रान खान आणि त्यांचा पक्ष दोघेही खोटे असल्याचे ते यावेळी म्हणाले. मंत्रिमंडळाच्या बैठकीत शहबाज शरीफ यांनी इम्रान खान यांचं सरकार पाडल्याच्या वृत्ताचंही खंडन केलं.
“पीटीआय देशाला विनाशाकडे घेऊन जात आहे. यापूर्वीच देश अनेक आव्हानांचा सामना करत आहे. त्यात आता असं केलं जात आहे. आपलं चलन मोठ्या प्रमाणात घसरलंय. आम्हाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागतोय,” असं शहबाज शरीफ म्हणाले. यावेळी त्यांनी इम्रान खान यांच्यावर थेट हल्लाबोल केला. गेल्या सरकारनं आयएमएफसोबतच्या करारांचं उल्लंघन केलंय. आता ते ठीक करण्याचे प्रयत्न केले जात असल्याचे ते म्हणाले.
Federal Cabinet advises imposition of Emergency. #ImranKhan
— The Pakistan Daily (@ThePakDaily) May 12, 2023
न्यायालयांवरही प्रश्नचिन्ह
यावेळी आपल्या मंत्रिमंडळाला संबोधित करताना त्यांनी न्यायालयांवरही प्रश्न उपस्थित केले. इम्रान खान यांच्या सरकारनं आमच्या पक्षाच्या नेत्यांवर सूड उगवला होता तेव्हा न्यायालयं शांत होती. जेव्हा आम्हाला तुरुंगात पाठवलं जात होतं तेव्हा न्यायालयांनी याची दखल घेतली का? असा सवालही त्यांनी केला.