..नको, आम्हीच तुमची ‘एक्स’ विकत घेतो! सॅम ऑल्टमनचा बाणेदारपणा अनेकांना भावला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 08:13 IST2025-02-14T08:13:09+5:302025-02-14T08:13:44+5:30
सॅम ऑल्टमन यांच्याही नशिबाचे फेरे असे की, ज्या ओपन एआयमुळे त्यांना जगभर प्रसिद्धी मिळाली, जगासमोर एक नवाच पर्याय त्यांनी उभा केला, त्याच सॅम ऑल्टमन यांना याच कंपनीतून बाहेरचा रस्ताही दाखवला गेला होता.

..नको, आम्हीच तुमची ‘एक्स’ विकत घेतो! सॅम ऑल्टमनचा बाणेदारपणा अनेकांना भावला
सॅम ऑल्टमन हे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स क्षेत्रातील दादा माणूस. ‘ओपन एआय’च्या माध्यमातून चॅट जीपीटी त्यांनी जगासमोर आणलं आणि त्यामुळे आख्खं जग आश्चर्यचकित झालं होतं. चॅटजीपीटीच्या माध्यमातून अनेक गोष्टी साध्य होत असल्यानं सर्वसामान्य माणसांनीही त्याला उचलून धरलं. २०१५मध्ये सॅम ऑल्टमन आणि इलॉन मस्क यांनी अन्य नऊ लोकांच्या साथीनं ‘ओपन एआय’ची स्थापना केली होती. त्यानंतर काही कारणानं इलॉन मस्क या कंपनीतून बाहेर पडले. बाहेर पडण्यापूर्वी आणि त्यानंतरही मस्क यांनी ओपन एआय आणि सॅम ऑल्टमन यांच्यावर मोठी टीका केली होती. ओपन एआयमधून विभक्त झाल्यानंतर मस्क यांनी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स क्षेत्रातील ‘एक्सएआय’ ही आपली दुसरी कंपनी सुरू केली होती.
सॅम ऑल्टमन यांच्याही नशिबाचे फेरे असे की, ज्या ओपन एआयमुळे त्यांना जगभर प्रसिद्धी मिळाली, जगासमोर एक नवाच पर्याय त्यांनी उभा केला, त्याच सॅम ऑल्टमन यांना याच कंपनीतून बाहेरचा रस्ताही दाखवला गेला होता. अर्थात त्यांना नंतर पुन्हा सन्मानानं ‘ओपन एआय’मध्ये आणण्यात आलं.
हा झाला इतिहास; पण त्याहीपेक्षा मोठी घडामोड नुकतीच घडली. आपल्या बोलण्या-वागण्यामुळे मस्क कायमच चर्चेच्या आणि वादांच्या केंद्रस्थानी असतात. राजकारणापासून ते तंत्रज्ञान आणि अंतरिक्षापासून ते खासगी नातेसंबंधांपर्यंत अनेक गोष्टींमुळे सातत्यानं ते प्रसिद्धीच्या झोतात असतात. इलॉन मस्क आणि सॅम ऑल्टमन हे जुने साथीदार. या दोघांनी मिळूनच ‘ओपन एआय’ची स्थापना केली होती; पण नंतर त्यातून विभक्त झाल्यानंतर अगदी काल-परवापर्यंत मस्क हे ओपन एआय आणि सॅम ऑल्टमन यांच्यावर टीका करीत होते. इतकं की, ओपन एआयच्या काही अधिकाऱ्यांविरुद्ध त्यांनी खटलाही दाखल केला होता. ओपन एआय नीतिमत्तेची पायमल्ली करत असल्याची कठोर टीका करत, ‘ओपन एआय’च्या क्षमतेवरही त्यांनी अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं; पण त्याच इलॉन मस्क यांनी परवाच सॅम ऑल्टमन यांना एक आश्चर्यकारक ऑफर दिली.
ज्या ओपन एआय आणि सॅम ऑल्टमन यांच्यावर त्यांनी आरोपांची राळ उडवली होती, त्याच ओपन एआयच्या खरेदीसाठी मस्क यांना सॅम यांच्यासमोर तब्बल ९.७४ अब्ज डॉलर्सचा (सुमारे ८४ हजार ६०० कोटी रुपये) प्रस्ताव ठेवला! ‘एक्सएआय’सोबत वेलोर इक्विटी पार्टनर्स, बॅरन कॅपिटल यांसारख्या गुंतवणूकदारांचाही त्यात समावेश आहे. वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार मस्क यांचे वकील मार्क टोबेरॉफ यांनी ‘ओपन एआय’च्या बोर्डासमोर हा प्रस्ताव ठेवण्यात आला. मस्क म्हणाले, ओपनएआयला मुक्त-स्रोत, सुरक्षाकेंद्रित शक्ती म्हणून परत येण्याची वेळ आली आहे. ते होईल याची आम्ही खात्री करू. या संपादनाद्वारे, मस्क यांना ओपन एआयला ना-नफा संशोधन प्रयोगशाळा बनवायची आहे.
सॅम ऑल्टमन यांनी मात्र हा प्रस्ताव बाणेदारपणे ठोकरताना मस्क यांच्यापुढे वेगळाच प्रस्ताव ठेवला. ‘एक्स’वर मस्क यांना सॅम म्हणाले, ‘नो, थँक यू! त्याऐवजी तुमची तयारी असेल तर आम्हीच ‘एक्स’ला (पूर्वीचे ट्विटर) तुम्ही आम्हाला जी ऑफर दिली, त्याच किमतीला खरेदी करण्याची तयारी आहे!’ सॅम यांच्या या ‘बाणेदार’पणाची समाजमाध्यमांवर चांगलीच वाहवा होत आहे!