बँकॉक - म्यानमारमधील ७.७ रिक्टर स्केल तीव्रतेच्या भीषण भूकंपामुळे शनिवारी तेथील मृतांची संख्या १६४४ वर पोहोचली आहे. त्या देशात या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या असून, त्यांच्या ढिगाऱ्याखाली आणखी मृतदेह आढळले. यामुळे मृतांच्या आकडेवारीत आणखी वाढ होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. म्यानमारमध्ये ३,४०८ जण जखमी झाले तर १३९ लोक अद्याप बेपत्ता आहेत. थायलंडमध्येहीभूकंपामुळे १० जणांचा मृत्यू झाला तर २६ जण जखमी व ७८ जण बेपत्ता आहेत.
म्यानमार हा देशांतर्गत संघर्ष व हिंसाचाराने आधीच बेजार झाला आहे. त्यात शनिवारी झालेल्या भूकंपाचे मोठे संकट ओढवले आहे. तेथील भूकंपग्रस्तांच्या बचावकार्यात तिथे असलेली अस्थिर राजकीय स्थिती, संसाधनांची कमतरता या कारणांमुळे अनेक अडथळे येत आहेत. शुक्रवारी झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू मंडाले शहराजवळ होता. त्याचे धक्के थायलंडमधील बँकॉक तसेच भारतातही काही ठिकाणी जाणवले. या शक्तिशाली भूकंपामुळे म्यानमारमधील अनेक इमारती, काही पूल कोसळले. एक धरण फुटले. त्या देशाची राजधानी नेप्यिडॉ येथे काही इमारती, रस्त्यांचे नुकसान झाले तसेच तेथील बहुतांश भागात वीज, दूरध्वनी, इंटरनेट सेवा बंद पडल्या.
थायलंडमध्ये भूकंपामुळे बँकॉक व त्याच्या आसपासच्या परिसरात धक्के बसले. या भागामध्ये सुमारे १७ लाख लोक राहतात. भूकंपाच्या तडाख्यामुळे तेथील चातुचाक मार्केटजवळ बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली होती. तेथील ४७ कामगार अद्याप बेपत्ता आहेत. या ढिगाऱ्याखाली दबलेल्यांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.
हवाई वाहतूक नियंत्रण टॉवर कोसळलाम्यानमारची राजधानी नेप्यिडॉ आंतरराष्ट्रीय विमानतळावरील हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाचा टॉवर भूकंपाच्या धक्क्याने कोसळल्याचे प्लॅनेट लॅब्सच्या उपग्रहाने टिपलेल्या छायाचित्रांतून दिसते. या टॉवरमध्ये किती कर्मचारी होते, त्यातील किती जखमी किंवा मृत झाले याचा तपशील अद्याप कळू शकलेला नाही.
मणिपूरमध्ये भूकंपाचा धक्कामणिपूरमधील ननी जिल्ह्यात शनिवारी दुपारी २ः३१ वाजता ३.८ रिक्टर स्केलचा भूकंप झाला. मात्र, त्यात कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झाली नाही, तसेच कोणीही जखमी झालेले नाही.
४० टन वस्तूंची मदत म्यानमारला भारतीय नौदलाच्या आयएनएस सातपुडा, आयएनएस सावित्री या दोन जहाजांमधून पाठवण्यात आली.८० एनडीआरएफच्या जवानांची तुकडी भारताने मदत आणि बचावतकार्यालसाठी शनिवारी म्यानमारला पाठविली आहे. ४२ कोटी रुपयांची तातडीची मदत बचावकार्यासाठी म्यानमारला दिली.
संयुक्त राष्ट्रांचाही सहकार्याचा हातसंयुक्त राष्ट्रांनी म्यानमारमधील बचावकार्यासाठी ४२ कोटी रुपयांची तातडीची मदत म्यानमारला दिली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, म्यानमारला आम्ही नक्की मदत करणार आहोत. मात्र अन्य देशांच्या करावयाच्या मदतीत सरकारने याआधीच मोठी कपात केली आहे. त्यामुळे ट्रम्प यांनी केलेली घोषणा खरोखरच वास्तवात उतरेल का याबद्दल अभ्यासकांनी शंका व्यक्त केली आहे.
चीन, रशियाने पाठविली म्यानमारला मोठी मदतचीन, रशियानेही मोठी मदत पाठविली आहे. चीनमधील युनान प्रांतातून एक बचावपथक म्यानमारमधील यांगून शहरात शनिवारी सकाळी पोहोचले. त्या पथकात ३७ जणांचा समावेश आहे. चीनमधील बीजिंग येथून ८२ जणांचे मदतपथकही पोहोचले आहे. रशियाने १२० जणांचे बचावपथक व साहित्य असलेली दोन विमाने म्यानमारला पाठविली. मलेशियाने ५० जणांचे मदतपथक तिथे पाठविले आहे.
भारताने दिला मदतीचा हात, १५ टन वस्तू विमानाने रवाना नवी दिल्ली - शक्तिशाली भूकंपाचा मोठा तडाखा बसलेल्या म्यानमारला भारताने शनिवारी ‘ऑपरेशन ब्रह्मा’ अंतर्गत मदतीच्या स्वरुपात विविध वस्तूंची १५ टन सामग्री हवाई दलाच्या विमानांतून पाठविली. त्यानंतर नौदलाच्या आयएनएस सातपुडा, आयएनएस सावित्री या दोन जहाजांमधून आणखी ४० टन वस्तूंची मदत म्यानमारला रवाना करण्यात आली.
हवाई दलाच्या दोन विमानांतून तिथे विविध वस्तूंच्या रूपात मदत पाठविण्यात आली, अशी माहिती परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दिली. ही मदतसामग्री भारताचे राजदूत अभय ठाकूर यांनी म्यानमारच्या यांगून प्रांताचे मुख्यमंत्री उ सोई थिन यांच्याकडे सुपूर्द केली. भारताने भूकंपग्रस्त म्यानमारमध्ये मदत आणि बचावकार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) ८० जवानांची तुकडी शनिवारी पाठविली आहे. तसेच त्या देशाला आणखी मदत पुरविण्याचीही भारताने तयारी ठेवली आहे.
भारत म्यानमारच्या पाठीशी उभा - मोदीम्यानमारमध्ये भीषण भूकंपामुळे उद्भवलेल्या भीषण स्थितीबाबत त्या देशाच्या लष्करी राजवटीचे प्रमुख मिन आंग हाइंग यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. या संकटाच्या काळात भारत म्यानमारच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे, असे मोदी यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, म्यानमारमध्ये भूकंपाने झालेल्या प्रचंड जीवितहानीबद्दल मी तीव्र शोक व्यक्त करतो. भारत ‘ऑपरेशन ब्रह्मा’ अंतर्गत भूकंपग्रस्त भागात आपत्कालीन मदत पोहोचविण्यासाठी सज्ज झाला आहे. भूकंपाचा तडाखा बसलेल्या म्यानमार, थायलंड या दोन्ही देशांना भारत सर्वतोपरी मदत करणार असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे.