मंगळावर धुळीचा राक्षस; वेग तब्बल ३७३ किमी प्रतितास; नासाने टिपली छायाचित्रे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 05:48 IST2025-10-11T05:47:58+5:302025-10-11T05:48:06+5:30
वावटळी इतक्या प्रचंड असतात की, त्या हजारो किलोमीटरपर्यंत पसरतात आणि सूर्यप्रकाश अडवतात.

मंगळावर धुळीचा राक्षस; वेग तब्बल ३७३ किमी प्रतितास; नासाने टिपली छायाचित्रे
वॉशिंग्टन : नासाच्या एक्स्प्रेस आणि एक्सोमार्स ट्रेस गॅस ऑर्बिटर या मोहिमांदरम्यान टिपलेल्या छायाचित्रांमध्ये मंगळ ग्रहावर घोंघावणाऱ्या धुळीच्या वावटळी स्पष्ट दिसत आहेत. या वादळांना ‘डस्ट डेव्हिल’ म्हटले जाते.
या वावटळी इतक्या प्रचंड असतात की, त्या हजारो किलोमीटरपर्यंत पसरतात आणि सूर्यप्रकाश अडवतात. हा वेग ३७३ किमी प्रतितास इतका नोंदवला गेला आहे. या वाळूच्या लाटांना “स्ट्रीक डस्ट डेव्हिल” म्हणजेच धुळीचा राक्षस असे म्हटले जाते. हे वादळ काही तास ते काही दिवस टिकू शकते. मंगळाच्या पृष्ठभागावर हे सारे नाट्य घडत असते.
आगामी काळात या ग्रहावर अंतराळवीर जाणार म्हणून...
मंगळावरील वादळांसंदर्भातील ही निरीक्षणे त्या ग्रहावरील वातावरणाचा अभ्यास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची आहेत. या वादळांमुळेच त्या ग्रहाचे तापमान, हवामान तसेच भविष्यातील मानवसृष्टीच्या शक्यतेचा अंदाज घेता येतो. आगामी काळात या ग्रहावर अंतराळवीर जाणार आहेत, त्यामुळे तेथील धुळीच्या वादळांचा सखोल अभ्यास करणे आवश्यक असल्याचे नासाच्या सूत्रांनी सांगितले.
मंगळ ग्रहाची वैशिष्ट्ये
रंग व स्वरूप : मंगळाला “लाल ग्रह” म्हटले जाते.
व्यास : सुमारे ६७७९ कि.मी. पृथ्वीपेक्षा सुमारे अर्ध्या आकाराचा आहे.
गुरुत्वाकर्षण : मंगळाचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या सुमारे ०.३८ पट आहे. म्हणजेच एखादी वस्तू पृथ्वीवर १० किलोची असेल, तर मंगळावर त्या वस्तूचे वजन ३.८ किलो इतके भरेल.
दिवस व वर्ष : एक मंगळदिवस = २४ तास ३७ मिनिटे.
मंगळावरील तापमान खूपच थंड असते. तिथे सरासरी तापमान-६० अंश सेल्सियस (कधी-१२५ ते २० अंश सेल्सियसपर्यंत).
वातावरणात बहुतांश कार्बन डायऑक्साइड (९५ टक्के) आहे.
मंगळावर आहे ऑलिम्पस मॉन्स हा सर्वांत मोठा पर्वत
त्या ग्रहावरील सर्वांत मोठा पर्वत ऑलिम्पस मॉन्स हा असून तो सौरमालेतील सर्वांत उंच पर्वत आहे.
त्या ठिकाणी व्हॅलिज मरिनरिज ही मंगळावरील दरी ही पृथ्वीवरील ग्रँड कॅनियनपेक्षा हजारपट मोठी आहे.
तिथे उत्तर व दक्षिण ध्रुवांवर पाणी आणि कार्बन डायऑक्साइडच्या बर्फाचे थर आहेत. उन्हाळ्यात हे वितळतात आणि हिवाळ्यात पुन्हा गोठतात.
मंगळाचे फोबोस, डायमोस हे २ लहान चंद्र आहेत: या ग्रहाच्या पृष्ठभागावर एकेकाळी पाणी वाहत होते, याचे पुरावे सापडले आहेत. यावर आणखी संशोधन सुरू आहे.