म्हणे... गाझावर अणुबॉम्ब टाका, इस्रायलचा मंत्री बरळला; नेतन्याहू यांनी केली मंत्रिमंडळातून हकालपट्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2023 09:36 AM2023-11-06T09:36:03+5:302023-11-06T09:36:41+5:30

इलियाहू यांनी गाझाच्या रहिवाशांना नाझी म्हणत, त्यांनी गाझापट्टीला मानवतावादी मदत देण्यासही आक्षेप घेतला. 

Drop Nuclear Bomb on Gaza, Israel Minister Blamed; Netanyahu expelled from the cabinet | म्हणे... गाझावर अणुबॉम्ब टाका, इस्रायलचा मंत्री बरळला; नेतन्याहू यांनी केली मंत्रिमंडळातून हकालपट्टी

म्हणे... गाझावर अणुबॉम्ब टाका, इस्रायलचा मंत्री बरळला; नेतन्याहू यांनी केली मंत्रिमंडळातून हकालपट्टी

खान युनिस (गाझा पट्टी) : मानवतावादी दृष्टिकोनातून युद्धविराम करण्याचे अमेरिकेचे आवाहन इस्रायलने अमान्य केल्यानंतर युद्ध थांबण्याची आशा धूसर झाली असताना इस्रायलचे वारसा मंत्री अमिचाई एलियाहू यांनी या युद्धात गाझापट्टीवर अणुबॉम्ब टाकणे हा एक पर्याय आहे, असे सुचवून खळबळ उडवली. त्यानंतर पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी त्यांना मंत्रिमंडळातून अनिश्चित काळासाठी निलंबित केले. दरम्यान, इस्रायली जेट लढाऊ विमानांनी रविवारी पहाटे गाझा पट्टीतील निर्वासितांच्या छावणीवर हल्ला केल्याने किमान ३३ लोक ठार आणि डझनभर जखमी झाले. इलियाहू यांनी गाझाच्या रहिवाशांना नाझी म्हणत, त्यांनी गाझापट्टीला मानवतावादी मदत देण्यासही आक्षेप घेतला. 

आतापर्यंत ९,४०० हून अधिक पॅलेस्टिनी ठार
इस्रायलच्या सैन्याने गाझा शहराला वेढा घातल्याच्या पार्श्वभूमीवर शहरात धुराचे लोट उठल्याचे दिसत आहे. गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, सुमारे एक महिन्याच्या युद्धात प्रदेशात ९,४०० हून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले आहेत. रविवारी पहाटे मध्य गाझामधील माघाझी निर्वासित छावणीवर हवाई हल्ले झाले, ज्यात किमान ३३ लोक ठार आणि ४२ जखमी झाले. ही छावणी अशा ठिकाणी आहे, जेथे इस्रायलच्या सैन्याने गाझामधील पॅलेस्टिनी नागरिकांना आश्रय घेण्याचे आवाहन केले होते.

पंतप्रधान नेतन्याहू म्हणतात... 
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इलियाहू यांच्यावर टीका केली. इलियाहू यांचे वक्तव्य वास्तविकतेवर आधारित नाही. इस्रायल आणि आयडीएफ निष्पापांना इजा होऊ नये म्हणून आंतरराष्ट्रीय कायद्याच्या सर्वोच्च मानकांनुसार कार्य करत आहेत. आमचा विजय होईपर्यंत आम्ही त्याचे पालन करत राहू, असे सांगत त्यांनी इलियाहू यांना अनिश्चित काळासाठी निलंबित केले. मात्र, यामुळे काही काळासाठी जगभरात खळबळ उडाली होती. नुकताच  इस्रायलने गाझातील एका विद्यापीठावर मोठा हल्ला करून मोठे नुकसान केले आहे.

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अचानक वेस्ट बँकमध्ये 
इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या वातावरणात अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांचा मध्यपूर्व दौरा सुरू आहे. त्यांची आणि महमूद अब्बास यांच्यात पश्चिम किनाऱ्यातील (वेस्ट बँक) रामल्ला शहरात बैठक झाली. 
हमासचा खात्मा झाल्यास गाझामध्ये कोणाचे नियंत्रण प्रस्थापित करायचे यावर ब्लिंकन यांना चर्चा सुरू करायची आहे, असे मानले जाते. वेस्ट बँक नंतर ब्लिंकन तुर्कस्थानला पोहोचणार आहेत. तत्पूर्वी इस्रायलमध्ये पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर ब्लिंकन यांनी शनिवारी जॉर्डनमध्ये अरब परराष्ट्रमंत्र्यांची भेट घेतली.

Web Title: Drop Nuclear Bomb on Gaza, Israel Minister Blamed; Netanyahu expelled from the cabinet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.