आपली झोळी फाटकी राहू नये म्हणून! टॅरिफ वॉरमधून संधीही निर्माण होऊ शकतात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 10:37 IST2025-05-01T10:36:21+5:302025-05-01T10:37:40+5:30
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफ वॉरमधून जशा अनेक अडचणी निर्माण होत आहेत, तशाच काही संधीही समोर येऊ शकतात. त्या संधी आपल्या पदरात पाडून घ्यायच्या असतील, तर काय करावे लागेल?

आपली झोळी फाटकी राहू नये म्हणून! टॅरिफ वॉरमधून संधीही निर्माण होऊ शकतात
सचिन दिवाण, मुक्त पत्रकार
अमेरिका आणि चीन यांच्यात गेल्या काही दिवसांत नव्याने सुरू झालेल्या व्यापार युद्धामुळे जगाला कापरे भरले आहे. सुरुवातीला अमेरिकेने वाढवलेल्या आयात शुल्क किंवा करामुळे विविध देशांनी नाराजी व्यक्त केली. चीनने मात्र अमेरिकेला जशास तसे उत्तर देत अमेरिकेतून चीनमध्ये येणाऱ्या मालावरही शुल्क वाढवण्यास सुरुवात केली. दोन्ही देशांकडून ही शुल्कवाढ होत-होत ती आता २४५ टक्क्यांवर गेली आहे. अमेरिका आणि चीनसह जगातील अनेक अर्थतज्ज्ञांच्या मते हा सर्व प्रकार वेडेपणाचा आहे. मात्र, त्यामुळे जागतिक व्यापार आणि बाजारपेठेवर, तसेच राजकारणावर होणारे परिणाम गंभीर आहेत. अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग या दोघांनाही ही बाब समजलेली नाही, असे म्हणता येणार नाही. पण एकदा हा खेळ सुरू केल्यानंतर कोणी प्रथम माघार घ्यायची, हा इभ्रतीचा मुद्दा होऊन बसला आहे. दोन्ही नेते सारखाच अडेलतट्टूपणा दाखवत आहेत. त्यांच्या या खेळात जागतिक बाजारपेठ मात्र भरडली जात आहे.
ट्रम्प यांनी सत्तेवर येताच जे चित्रविचित्र निर्णय घेण्यास सुरुवात केली त्यापैकी एक म्हणजे अनेक देशांतून अमेरिकेत आयात होणाऱ्या मालावरील शुल्क वाढवणे. त्यांच्या मते, ते देशही असेच करत असल्याने जशास तसे धोरण अंगिकारणे गरजेचे होते. शिवाय यातून प्रामुख्याने चीनला धडा शिकवणे आणि अमेरिकी अर्थव्यवस्थेला पुन्हा उर्जितावस्था मिळवून देणे, हा हेतू असल्याचे त्यांनी सांगितले.
आता जहाजनिर्मिती उद्योगावरून कुरघोडीचे प्रयत्न
रेअर अर्थ मेटल्स या प्रकारातील १७ धातू सध्या जागतिक उद्योग, व्यापार आणि भू-राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यांच्या उत्पादनावर सध्या चीनचा जवळपास एकाधिकार आहे. हे धातू मोबाइल फोन, संगणक यापासून क्षेपणास्त्रांपर्यंत अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांत वापरले जातात. चीनने त्यापैकी सात धातूंची अमेरिकेला होणारी निर्यात बंद करण्याचे जाहीर केले.
अमेरिकेने चीनला पुरविले जाणारे अत्याधुनिक सेमीकंडक्टर चिप्सचे तंत्रज्ञान रोखले. अमेरिकेतील मोबाइल फोन, संगणक कंपन्यांच्या उत्पादनांचे बरेचसे सुटे भाग चीनमधून येतात. चीनने त्यांचा पुरवठा रोखला. त्यावर ट्रम्प यांनी जाहीर केले की, चीनमधून येणाऱ्या सेमीकंटक्टर्सवर अमेरिका यापुढे अवलंबून राहणार नाही. अमेरिका देशांतर्गत सेमीकंडक्टर निर्मितीत वाढ करेल.
चीनच्या अनेक विमान वाहतूक कंपन्यांनी अमेरिकेतील बोईंगसारख्या कंपन्यांकडून विमाने विकत घेण्यासाठी मागणी नोंदविली होती. आता चीनने या विमानांची डिलिव्हरी घेण्यास नकार दिला आहे. जागतिक जहाजनिर्मिती क्षेत्रातही सध्या चीनची मक्तेदारी आहे. अमेरिकेसह अनेक देश सागरी व्यापारासाठी चिनी जहाजांवर अवलंबून आहेत. आता ट्रम्प यांनी जाहीर केले की, अमेरिका पुन्हा देशांतर्गत जहाजनिर्मिती उद्योगाला चालना देईल आणि अमेरिकी बंदरांत येणाऱ्या चिनी जहाजांवर अतिरिक्त शुल्क आकारेल.
चीन-अमेरिकी अर्थव्यवस्था परस्परावलंबी
ट्रम्प यांच्या फटकाऱ्यातून शत्रूंबरोबरच मित्र देशही सुटले नाहीत. त्यात भारतासह अनेक युरोपीय देशांचाही समावेश होता. त्यातील अनेक देशांनी अमेरिकेबरोबर नव्याने वाटाघाटी सुरू केल्या. अमेरिकेच्या या कृतीला चीन फारसा बधला नाही. त्यानेही अमेरिकेवर असेच वाढीव शुल्क लादले. चीनबरोबर अमेरिकेने कितीही शत्रुत्व दाखविले तरी दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्था इतक्या परस्परावलंबी बनल्या आहेत की, त्यांना प्रत्यक्ष संघर्ष करणे अवघड बनले आहे.
महत्त्वाच्या उत्पादनांचा कंपन्या करताहेत साठा
टॅरिफ वॉरचा जागतिक शेअर बाजार आणि व्यापारावर मोठा परिणाम होत आहे. हे व्यापारयुद्ध कोणत्या दिशेने जाईल, हे सांगणे कठीण झाल्याने विविध देश, कंपन्या व गुंतवणूकदार सावध पवित्रा घेत आहेत.
सेमीकंडक्टर्ससारख्या महत्त्वाच्या उत्पादनांचा जागतिक बाजारपेठेतील पुरवठा खंडित झाला तर ऐनवेळी समस्या येऊ नये म्हणून कंपन्या त्यांचा साठा करून ठेवू लागल्या आहेत. बाजारपेठेत अनेक उत्पादनांचे दर अचानक वाढू लागले आहेत.
जागतिकीकरणाची चक्रे उलटी फिरविण्याचा उद्योग
गेली काही दशके जागतिकीकरणाची जी प्रक्रिया सुरू होती तिची चक्रे बरोबर उलटी फिरवण्याचा हा उद्योग आहे. जगाची एकत्रित बाजारपेठ तयार करणे, वस्तू, सेवा, भांडवल, तंत्रज्ञान आणि कामगारांची मुक्त हालचाल करणे, त्यातून सर्वांनाच फायदा होणे अशी ती संकल्पना होती.
पण आता अमेरिकेसारख्या प्रमुख देशानेच जगाची चिंता सोडून केवळ आपल्या फायद्याला प्राधान्य देण्याचे धोरण स्वीकारल्याने पुन्हा एकदा अनिश्चितता येत आहे. सर्वच देश त्या अनुषंगाने आपापल्या भूमिकेची फेरमांडणी करत आहेत. त्यातून काही अडचणी निर्माण होत आहेत, तशाच काही संधीही समोर येऊ शकतात.
अर्थात, त्या संधी आपल्या पदरात पाडून घ्यायच्या असतील, तर आपली झोळी फाटकी असणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल. देशांतर्गत अर्थव्यवस्था आणि उत्पादन व्यवस्थेत असलेल्या त्रुटी वेगाने दूर करून नव्या जगाचे नवे प्रश्न हाताळण्यासाठी सज्ज झाले पाहिजे.