डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 23:32 IST2025-08-07T23:31:50+5:302025-08-07T23:32:55+5:30
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त २५ टक्क्यांसह एकूण ५० टक्के टॅरिफ लावला आहे. त्यानंतर पहिल्यांदाच चीनने भूमिका मांडली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवल्यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी २५ टक्के अतिरिक्त टॅरिफ लादला. त्यामुळे भारतातून अमेरिकेत निर्यात केल्या जाणाऱ्या वस्तूंवरील टॅरिफ ५० टक्क्यांवर पोहोचला आहे. ट्रम्प यांच्या या टॅरिफ बॉम्बवर चीनने तिखट प्रतिक्रिया दिली आहे. टॅरिफचा हा दुरुपयोग आहे, असे चीनने म्हटले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जियाकून यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाबद्दल विचारण्यात आले. जियाकून म्हणाले, "चीनने नेहमीच टॅरिफच्या दुरुपयोगाचा विरोध केला आहे. आमची याबद्दलची भूमिक अतिशय स्पष्ट आणि ठाम आहे." ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू केल्यानंतर चीनने भूमिका मांडली आहे.
भारतावर आणखी निर्बंध लावण्याचा इशारा
अतिरिक्त २५ टक्क्यांसह अमेरिकेने भारतावर ५० टक्के टॅरिफ लादला आहे. यानंतरही ट्रम्प यांनी पुन्हा एकदा निर्बंध लावण्याचा इशारा दिला आहे. दुय्यम निर्बंध लावण्यासंदर्भात पावले टाकली जातील, असे ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमधील एका पत्रकार परिषदेत सांगितले.
"भारतावर टॅरिफ लावून ८ तासच झाले आहेत. पुढे तुम्हाला बरंच काही बघायला मिळेल. काही सेकंडरी निर्बंधांची लाट येणार आहे", असे उत्तर ट्रम्प यांनी दिले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरुवातील २५ टक्के टॅरिफ लावला, तो ७ ऑगस्टपासून लागू झाला आहे. तर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ २७ ऑगस्टपासून लागू होणार आहे.