"मी हस्तक्षेप केला नसता, तर पाकिस्तानी पंतप्रधानांचा जीव गेला असता!"; डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 09:44 IST2026-02-25T09:42:02+5:302026-02-25T09:44:23+5:30
Trump State of the Union 2026: डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन संसदेत 'स्टेट ऑफ द युनियन' भाषण दिले. यामध्ये त्यांनी भारत-पाकिस्तान अण्वस्त्र युद्ध रोखल्याचा आणि साडेतीन कोटी लोकांचे प्राण वाचवल्याचा दावा केला.

"मी हस्तक्षेप केला नसता, तर पाकिस्तानी पंतप्रधानांचा जीव गेला असता!"; डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमधील तणावावर भाष्य करताना अत्यंत खळबळजनक विधान केले आहे. "जर मी वेळेवर हस्तक्षेप केला नसता, तर पाकिस्तानी पंतप्रधानांना जीव गमवाला लागला असता," असा दावा ट्रम्प यांनी केला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन संसदेत दिलेल्या आपल्या 'स्टेट ऑफ द युनियन २०२६' भाषणामध्ये भारत आणि पाकिस्तानमधील युद्धाबाबत पुन्हा एकदा मोठा दावा केला आहे. भारत आणि पाकिस्तान अण्वस्त्र युद्धाच्या उंबरठ्यावर होते, परंतु आपल्या हस्तक्षेपामुळे हे युद्ध थांबले आणि साडेतीन कोटी लोकांचे प्राण वाचले, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
'पहलगाम' दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी अड्ड्यांवर 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत जोरदार प्रहार केले होते. या कारवाईमुळे दोन्ही अण्वस्त्रधारी देशांमध्ये युद्धाची ठिणगी पडली होती. ट्रम्प यांच्या मते, ही परिस्थिती अण्वस्त्र युद्धाच्या उंबरठ्यावर होती आणि दोन्ही देशांनी एकमेकांची अनेक लढाऊ विमाने पाडली होती.
ट्रम्प यांचा 'टॅरिफ'चा धाक
ट्रम्प यांनी सांगितले की, त्यांनी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना २०० टक्के आयात शुल्काची धमकी दिली होती. "तुम्ही युद्ध थांबवले नाही, तर तुमच्याशी होणारा सर्व व्यापार बंद करू," असा सज्जड दम भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी दोन्ही देशांनी युद्धविराम जाहीर केला, असा दावा ट्रम्प यांनी केला आहे.
#WATCH | Addressing the 2026 State of the Union, United States President Donald Trump says, "... In my first 10 months, I ended eight wars... Pakistan and India would have had a nuclear war. 35 million people said the Prime Minister of Pakistan would have died if it were not for… pic.twitter.com/GnrgJKtjID
— ANI (@ANI) February 25, 2026
भारताची भूमिका
दरम्यान, भारताने ट्रम्प यांचा मध्यस्थीचा दावा नेहमीच फेटाळून लावला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, दोन्ही देशांच्या लष्करी संचालन महासंचालकांनी थेट चर्चेद्वारे हा युद्धविराम घडवून आणला होता. काश्मीर किंवा पाकिस्तानशी संबंधित कोणताही विषय हा द्विपक्षीय असून, त्यात तिसऱ्या पक्षाच्या मध्यस्थीची गरज नाही, हे भारताने सांगितले होते. तरीही ट्रम्प हे भारत-पाकिस्तान युद्धाबाबत दावे करतच आहेत.