भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 12:03 IST2025-08-27T12:00:56+5:302025-08-27T12:03:59+5:30
जर्मन वृत्तपत्रात भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार आणि ऑपरेशन सिंदूरनंतर दोन्ही देशांमध्ये वाढलेला तणावावर विस्ताराने लिहिण्यात आले आहे.

भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
नवी दिल्ली - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चार कॉल केले मात्र मोदींनी त्यांच्याशी संवाद साधला नाही या दाव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. जर्मन वृत्तपत्र फ्रॅकफर्टर यांनी या कॉलबाबतचा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. ट्रम्प यांनी चार वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत बोलण्याचा प्रयत्न केला परंतु चारही वेळा ट्रम्प यांच्याशी संवाद साधण्यास नकार देण्यात आला असा दावा या रिपोर्टमध्ये केला आहे. वृत्तपत्राच्या या दाव्यावर भारत सरकारकडून अद्याप कुठलीही प्रतिक्रिया आली नाही.
जर्मन वृत्तपत्रात भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार आणि ऑपरेशन सिंदूरनंतर दोन्ही देशांमध्ये वाढलेला तणावावर विस्ताराने लिहिण्यात आले आहे. त्यानुसार, ज्या लज्जास्पद पद्धतीने अमेरिकन राष्ट्राध्यक्ष उपखंडाला त्यांची अर्थव्यवस्था खुली करण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न करत आहेत ते भारतीय सरकारच्या प्रमुखांना भूतकाळातील कटू अनुभवाची आठवण करून देते. फ्रेब्रुवारी महिन्यात व्हाइट हाऊसने महान नेता आणि आमची एकत्र यात्रा असं सांगत मोदींचे कौतुक केले होते. मात्र त्यानंतर ट्रम्प यांचे सूर बदलले. त्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेचा डेड अर्थव्यवस्था असा उल्लेख केला. जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असणाऱ्या भारत देशात अमेरिकन कृषी कंपन्यांना एन्ट्री देण्यात नकार देण्यात आल्यापासून हा वाद वाढला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या वागणुकीवर पंतप्रधान मोदी नाराज आहेत. अलीकडच्या काळात ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चार वेळा फोनवरून संवाद साधण्याचा प्रयत्न केला परंतु मोदींना त्यास नकार दिला. त्यामुळे अमेरिकेच्या धोरणावर भारताची नाराजी असल्याचे स्पष्ट दिसून आले पण भारताचे हे वर्तन त्यांची राजनैतिक सावधगिरी देखील दाखवते असं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. याआधी अमेरिकेने व्हिएतनामसोबत ट्रेड डिलची घोषणा केली. व्यापार करारासाठी अमेरिका आणि व्हिएतनाम यांच्यात चर्चा झाली परंतु कुठल्याही अंतिम निर्णयाआधीच ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडियावर या कराराची घोषणा केली.
दरम्यान, अमेरिकेचे धोरण काम करत नाही. भारत कधीही चीनविरोधात जात अमेरिकेसोबत येण्याचा शब्द देऊ इच्छित नाही. भारताच्या एकूण निर्यातीपैकी २० टक्के अमेरिकेला जातो. त्यात मुख्यत: कपडे, रत्न आण ऑटो पार्ट्सचा समावेश आहे असं अमेरिकन पॉलिसी एक्सपर्ट मार्क फ्रेजियर यांनी म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात शेवटचे बोलणे १७ जून रोजी झाले होते. २७ ऑगस्टपासून भारतातून अमेरिकेला होणाऱ्या निवडक वस्तूंवर ५० टक्के टॅरिफ लागू झाला आहे. या निर्यातीवर ७ ऑगस्टपासून २५ टक्के टॅरिफ होता. रशियाकडून तेल खरेदी करण्यापासून रोखण्यासाठी अमेरिका भारतावर टॅरिफचा दबाव आणत आहे.