औषधांवर २०० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्लॅन; भारतावर किती होणार परिणाम?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 11:28 IST2025-09-02T11:27:43+5:302025-09-02T11:28:25+5:30
औषधांवर २०० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्यामागे ट्रम्प यांचा मुख्य हेतू फार्मा कंपन्यांवर दबाव टाकून त्यांना त्यांचे उत्पादन अमेरिकेत स्थलांतरित करायला लावणे हा आहे.

औषधांवर २०० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्लॅन; भारतावर किती होणार परिणाम?
वॉश्गिंटन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प देशात आयात होणाऱ्या औषधांवर २०० टक्के किंवा त्याहून अधिक टॅरिफ लावण्याचा प्लॅन आखत आहेत. यामुळे औषध उत्पादक कंपन्या अमेरिकेत त्यांचे उत्पादन वाढवू शकतात अशी अपेक्षा ट्रम्प यांना आहे. परंतु या कंपन्यांना पुरेसा वेळ मिळावा यासाठी हे टॅरिफ लागू करण्यासाठी एक ते दीड वर्षाची मुदत देऊ शकतात असं बोलले जाते.
भारतावर काय होणार परिणाम?
भारत हा जगातील जेनेरिक औषधांचा प्रमुख निर्यातदार देश आहे. जर अमेरिकेने टॅरिफ लावले तर भारतीय औषध उत्पादन कंपन्यांना मोठे नुकसान होऊ शकते. त्यांच्या निर्यातीवर त्याचा परिणाम होईल. परंतु काही रिपोर्टनुसार, ट्रम्प प्रशासन चीनहून आयात औषधे आणि त्यांच्या कच्च्या मालावर अधिक फोकस करत असल्याचे सांगितले जाते. औषधांवर २०० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्यामागे ट्रम्प यांचा मुख्य हेतू फार्मा कंपन्यांवर दबाव टाकून त्यांना त्यांचे उत्पादन अमेरिकेत स्थलांतरित करायला लावणे हा आहे. याआधीच काही मोठ्या कंपन्या जॉन्सन अँन्ड जॉन्सन आणि रोशसारख्यांनी अमेरिकेत गुंतवणूक वाढवण्याची घोषणा केली आहे.
उलटा परिणाम होण्याची शक्यता
काही तज्ज्ञांच्या मते, इतक्या उच्च टॅरिफचा उलटा परिणाम अमेरिकेवरच होऊ शकतो. त्यातून औषधांच्या किंमती वाढणे आणि औषधांचा तुटवडा निर्माण होण्याचा धोका आहे. विशेषत: जेनेरिक औषधे, जे आधीच कमी नफ्यावर विकली जातात, त्यावर याचा प्रभाव पडू शकतो. २५ टक्के टॅरिफही अमेरिकेत औषधांचा खर्च जवळपास ५१ अब्ज डॉलरपर्यंत वाढवू शकतो. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या प्रस्तावित निर्णयामुळे औषध कंपन्या आणि उद्योजकांनी नाराजी व्यक्त केली आहे. टॅरिफमुळे औषध उत्पादनावर वाईट परिणाम होईल असं त्यांनी म्हटलं. मात्र २०० टक्के टॅरिफ ही केवळ तडजोड करण्यामागची एक नीती असल्याचं तज्ज्ञ सांगतात.